जे.के. फाईल बसस्टॉपजवळ ‘हिट अँड रन’

अज्ञात कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी

रत्नागिरी:- शहरातील मिऱ्या-नागपूर हायवेवर जे.के. फाईल बसस्टॉपजवळ एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला असून, धडक देऊन कारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. सचिन चंद्रकांत खेत्री (वय २५, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन खेत्री हे रविवारी, २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील ॲक्सेस गाडी (क्र. MH 08 BH 6260) घेऊन रत्नागिरी रेल्वे स्टेशनकडून साळवी स्टॉपच्या दिशेने जात होते.
​जे.के. फाईल बसस्टॉपच्या अलीकडे, पोस्ट ऑफिससमोरील पुलावर सध्या काम सुरू आहे. याच ठिकाणी समोरून (साळवी स्टॉपकडून कुवारबावच्या दिशेने) येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीने सचिन यांच्या गाडीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर अज्ञात कारचालक तेथे न थांबता वेगाने पसार झाला.

​या भीषण धडकेत सचिन खेत्री यांच्या डोक्याला मागील बाजूस मुका मार लागला असून, डाव्या डोळ्याजवळ, डाव्या हाताला आणि दोन्ही पायांना खरचटून किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
​अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल
​याप्रकरणी सोमवारी पहाटे ३:०७ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १८४, १३४(ब), १७७ अन्वये अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस फरार कारचालकाचा शोध घेत आहेत.