जे. के. तील कर्मचाऱ्यांना अधिकाधिक मोबदला मिळावा यासाठी पुढील आठवड्यात पुन्हा बैठक

रत्नागिरी:- रत्नागिरीतील जे. के. फाईल्स कंपनीच्या कामगारांना योग्य मोबदला मिळून देण्यासाठी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी कंपनी व्यवस्थापनाची पाठ धरली आहे. स्वेच्छा निवृत्तीनंतर स्थानिक कामगारांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा म्हणून पालकमंत्री पुन्हा पुढच्या आठवड्यात कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्याच्या विचारात आहेत.

उत्पादनाला मागणी नसल्याने जे. के. फाईल्स कंपनीतील कामगारांना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय देण्यात आला. परंतू ही निवृत्ती घेणाऱ्यांना 7 लाख रुपयांपेक्षा अधिक मोबदला मिळणार नसल्याने कामगारांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती. कंपनीत 200 पेक्षा अधिक कायम कामगार असून यातील बहुसंख्या कामगारांनी नवीन घर, सदनिका, वाहनांसाठी कंपनी कामगारांच्या सहकारी संस्थांमधून 4 ते 5 रुपयांपर्यंत कर्ज घेतली आहेत. त्यामुळे पुरेसा मोबदला न मिळाल्यास कामगारांची अडचण होणार आहे.

कंपनीच्या कामगारांची ही अडचण लक्षात घेवून पालकमंत्री उदय सामंत यांनी कामगारांसह कंपनीच्या अधिकार्‍यांशी बैठक घेवून चर्चा केली. त्यांनी पालकमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक घेण्याची तयारी दर्शवली. त्याचवेळी कामगारांना न्याय मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांना दिली. त्यानुसार मुंबईत गेल्या महिन्यात बैठकीच आयोजन करण्यात आले. परंतु, या बैठकीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहू न शकल्याने तोडगा निघाला नाही. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पालकमंत्र्यांच्या रत्नागिरी दौर्‍यात कंपनी कामगारांनी ना. सामंत यांची भेट घेवून पुन्हा कंपनीच्या प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेण्याची विनंती केली. पालकमंत्र्यांनी या मागणीला प्रतिसाद दिला असून पुढच्या आठवड्यात बैठकीचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले आहे.