जेलनाक्यात रिक्षावर माकडाने उडी मारल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात

रत्नागिरी:-जेलनाका येथे रविवारी दुपारी विचित्र अपघात झाला. माकडाने रिक्षावर उडी मारल्याने चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा पलटी झाली. रत्नागिरी एस.टी. स्टँडकडून मारुती मंदिरच्या दिशेने रिक्षा चालक जात होता. भरधाव वेगातील रिक्षा पलटी झाल्याने रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर रिक्षा चालक जखमी झाला. 

रत्नागिरी शहर परिसरात सध्या माकडांची संख्या  मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक ठिकाणी ही माकडे टोळ्यांनी फिरत असतात. अचानक ही माकडे रस्त्यावरून उड्या मारून रस्ता क्रॉस करतात, त्यामुळे अनेक वेळा दुचाकी व अन्य वाहनांना अपघात होण्याचे प्रकार झाले आहेत.