रत्नागिरी:-भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार दि. 27 मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार आहे. त्या नंतर मोसमी पावसाचा प्रवास राज्याच्या दिशेने सुरू होताना 5 जूनपर्यंत तळकोकण गाठेल, असा अंदाज वर्तवला आहे.
मोसमी पावसाचे प्रवेशद्वार असलेल्या तळकोकणात आता यंदाचा मोसमी पावासाच अंदाजित मुहूर्त कुलाबा वेधशाळेने निश्चित केला आहे. तरीही दरम्यानच्या काळात किनारी भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पूर्व मोसमी पाऊस सक्रीय राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला असून पावसाने नैऋत्य मान्सून संपूर्ण अंदमान निकोबार बेटे, संपूर्ण अंदमान समुद्र व्यापला आहे. तर मोसमी पाऊस आता दक्षिण-पूर्व, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत पुढे सरकला असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मान्सूनचा आतापर्यंतचा प्रवाह चांगला राहिल्यामुळे यंदा वेळेआधीच मोसमी पाऊस दाखल झाला आहे. आगामी तीन दिवसानंतर 27 मेपर्यंत मासमी पाऊस भारतीय किनारपट्टीवर पोहोचेल आणि केरळमध्ये दाखल होईल. कुलूबा वधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार मोसमी पाऊस 5 जूनला तळ कोकणात दाखल होईल.
दरम्यान, अरबी समुद्र आणि बेटांच्या क्षेत्रांवर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातही मळभी वातावरणाचे आच्छादन कायम राहणार आहे. या कालावधीत बिगर मोसमीच्या सरी सुरू रहणार आहेत. त्यामध्ये सातत्य राहणार असले तरी जोर कमी राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पूर्व मोसमीच्या सरींचा वेग मंदावला आहे. तापमानातही किंचीत घट झाली आहे.









