जुन्या पेन्शन योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी नाद

रत्नागिरी:- जुनी पेन्शन लागू व्हावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर होते. संपकऱ्यांनी सोमवारी (ता. २०) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरादर थाळीनाद केला. अक्षरशः जोरजोरात थाळ्या बडवून घोषणाबाजी केली. काही अतिउत्साही कर्मचारी रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली. यात वाहनधारक आणि प्रवाशांची विनाकारण गैरसोय झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाहतूक कोंडी फुटली.

संपाचा आजचा सातवा दिवस होता. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपकऱ्यांनी टप्प्या-टप्प्याने काही उपक्रम हाती घेतले आहेत. ते यशस्वी होतना दिसत आहे. सोमवारी सकाळी सर्व संपकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झाले. एका हातात चमचा आणि एका हातात थाळी घेऊन हे कर्मचारी जोरजोरात थाळी बडवत घोषणाबाजी करत होते. मोठ्या संख्येने संपकरी गोळा झाले होते. पेन्शसह अन्य मागण्यांसाठी
त्यांच्याध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. महिलादेखील त्यामध्ये मागे नव्हत्या. एकच मिशन, जुनी पेन्शन. पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, अशा घोषणा आणि थाळीनाद करून जोरदार वातावरण निर्मिती केली.

घोषणा देत थाळीनाद करीत उत्साही कर्मचारी हळुहळू रस्त्यावर आले. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत गेली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु जयस्तंभ सर्कलला चारी बाजूंनी वाहने आल्याने ही कोंडी झाली. पोलिस आणि संपकऱ्यांपैकी काही पदाधिकारी पुढे आले आणि त्यांनी ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी एकत्र आल्याने वाहतूक कोंडी वाढत गेली. शासनाच्या नकारात्मक भूमिकेचा निषेध करण्यासाठी थाळीनाद करण्यात आला.