जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार; रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांची घोषणा

रत्नागिरी:- जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना केली जाईल. या समितीमध्ये अर्थमंत्री, शिक्षण मंत्री आणि संबंधित मंत्री तसेच संघतेनेच्या एक, दोन सदस्यांचा सहभाग राहील. सर्व बाबी पडताळून योग्य निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत केली.

रत्नागिरीत आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. भविष्यात शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच शिक्षकांना
मुख्यालयी राहण्याचे बंधन काढून टाकणार तसा जीआर लवकरच काढला जाईल. मुंबईत शिक्षक भवन साठी जागा देणार असून यातून मुंबईत शिक्षकांची राहण्याची व्यवस्था होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

हे सरकार तुमचं आहे, तुमच्या हिताचाच निर्णय घेणार असे सांगत जुनी पेन्शनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या समितीमध्ये अर्थमंत्री, शिक्षण मंत्री तसेच संबंधित मंत्री आणि आपला एक प्रतिनिधी घेत एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढू असे मुख्यमंत्री म्हणाले. या समितीत सकारात्मक चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ. जे बोलू ते करू, चुकीचे आश्वासन कधीच दिलेलं नाही असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.