जुन्या पेन्शन योजनेसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

दुचाकी ‘रॅली’तून प्रशासनाचे लक्ष वेधले

रत्नागिरी:- जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय तसेच निमशासकीय कर्मचार्‍यांनी रत्नागिरीत बुधवारी (ता. २१) दुचाकी रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. एकच मिशन, जुनी पेन्शन अशा घोषणा देत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली.

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीचे आंदोलन देशभरात विविध ठिकाणी सुरू असून राजस्थान, छत्तीसगड व झारखंड तसेच पश्‍चिम बंगाल राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करून कर्मचार्‍यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान केली आहे. महाराष्ट्र राज्यातही मागील बर्‍याच वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलने सुरू आहेत. अद्यापही राज्याने आपल्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही. त्यामुळे शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेमार्फत उद्या बाईक रॅलीचे आयोजन केले. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवन इथून सुरू झालेली कर्मचार्‍यांची दुचाकी रॅली एकच मिशन जुनी पेन्शन, अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. प्रशासनाने आपल्या मागणीचा विचार केला नाही तर भविष्यात मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कर्मचार्‍यांनी दिला. या दुचाकी रॅलीत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना, जिल्हा शाखा रत्नागिरी, जिल्हा परिषद ग्रामसेवक संघटना, जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, वाहनचालक संघटना, पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचा सहभाग होता. दरम्यान, रॅलीत जिल्ह्यातील शिक्षकांनीही मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आग्रही भुमिका घेतली होती. त्यासाठी सह्यांची मोहीम राबवली होती.