रत्नागिरी:-रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी तीन ठिकाणी एकाच वेळी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. आधीच शहराला पाणी टंचाईची झळ बसून एक दिवस आड पाणी पुरवठा होत असल्याने नगर पालिकेच्या गलथानपणाचा फटका पुन्हा एकदा बसला.
नव्या नळपाणी योजनेचा फटका अनेक दिवस रत्नागिरीकरांना बसत आहे. अद्याप या योजनेचे काम पूर्णत्व:ला गेलेले नाही. अद्याप जुन्या योजनेवरही अर्धे अधिक शहर अवलंबून आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे पानवल धरणातील पाणी साठा संपल्याने शहराला सध्या शीळ धरणावर अवलंबून रहावे लागत आहे.
शहरातील साळवीस्टॉप येथून पेठकिल्ला येथील टाकीमध्ये अद्यापही जुन्याच जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे. मंगळवारी रात्री टाकीत पाणी सोडण्यात आल्यावर पाण्याच्या दाबाने बँक ऑफ इंडिया मारुती मंदिर शाखा, समाजनेते स्व. शामराव पेजे पुतळ्यासमोर व जिल्हा परिषदसमोर अशा तीन ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने मोठ्याप्रमाणात पाणी वाया जात होते.
बुधवारी दिवसभर नगर पालिका कर्मचारी पाईपलाईफ फुटलेल्या ठिकाणी दुरुस्ती करीत होते. या कामासाठी दोन दिवस लागणार असल्याचे नगर पालिका पाणी विभागाचे कर्मचारी श्री. भोईर यांनी सांगितले. आधीच एक दिवस आड पाणी मिळत असून अशा पध्दतीने हजारो लीटर पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांमधून नगर पालिका कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.