जुनी संचमान्यता कायम ठेवण्यास मंजुरी

शिक्षक आमदार पाटील यांचा पाठपुरावा; शिक्षकांना दिलासा

रत्नागिरी:- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची विद्यार्थीसंख्या कमी झाली होती. विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी कोणतीही संधी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळालेली नव्हती. या परिस्थितीमध्ये नवीन निकष लावून संचमान्यता केली. यात अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले असते. त्यामुळे कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी २८ फेब्रुवारी २०२२ चे परिपत्रक रद्द करण्याची केलेली मागणी मान्य झाली असून, जुनी संचमान्यता कायम ठेवण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे कोकणातील अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२०२० पासून सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थीसंख्या कमी झालेल्या होत्या. अशा वातावरणात जर नवीन निकष लावून संचमान्यता केली असती तर अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले असते. या गंभीर प्रश्नाची तत्काळ दखल घेत कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी या संदर्भात २८ फेब्रुवारी २०२२ चे परिपत्रक तत्काळ रद्द करण्यात यावे आणि २०१९- २० आणि २०२०-२१ ची संचमान्यता २०२१-२२ साठी कायम ठेवावी, अशी मागणी शासनदरबारी निवेदनाद्वारे केली होती. या संदर्भात संघटनेचा फेब्रुवारी महिन्यापासून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. श्री. पाटील यांनी ही मागणी पटलावर मांडलेली होती. ती मान्य झाली असून, २८ फेब्रुवारी २०२२ चे परिपत्रक रद्द करण्यात आले आहे. २०१९-२० आणि २०२०-२१ ची संचमान्यता २०२१-२२ साठी सुद्धा कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त होण्यापासून दिलासा मिळाला आहे.