जीवन प्राधिकरणाला १७८ कोटींचा बुस्टर; १२ योजनांची कामे हाती

रत्नागिरी:-जिल्ह्यात घरघर लागलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सुगीचे दिवस आले आहेत. सुमारे १७८ कोटीच्या १२ पाणी योजनांची कामे प्राधिकरणाला मिळाली आहेत. यातील काही योजना पूर्ण झाल्या आहेत. काही पूर्णत्वाच्या मार्गावर असून अपवादात्मक एखादी योजना रखडली आहे. त्यामुळे प्राधिकरणाला पाणी योजनांचा चांगलाच बुस्टर मिळाल्याने कार्यालयात सध्या कामाची जोरदार लगबग सुरू आहे. या योजनांनी प्राधिकरणाला ऊर्जितावस्था मिळाली आहे.  

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थिती काही वर्षांपूर्वी अतिशय बिकट होती. सुमारे ४० ते ५० टक्के कर्मचारी येथे काम करतात. छोट्या-मोठ्या नवीन पाणी योजना उभारून किंवा त्यांची ठेकेदारी पद्धतीवर दुरुस्तीतूनच प्राधिकरणाला आर्थिक स्रोत निर्माण होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्राधिकरणाला अपेक्षित कामे मिळत नव्हती. येथील कार्यालय परावलंबी बनली होती. औरंगाबाद, नाशिक आदी भागात मोठ्या प्रमाणात प्राधिकरणाकडून पाणी योजना उभारल्या जात आहेत. त्या कार्यालयाच्या जोरावर येथील कार्यालयाचा भार सुरू होता. अशक्त बनलेल्या या कार्यालयाला आता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या १२ नवीन पाणी योजनानी सशक्त बनविले आहे.

रत्नागिरी शहरासाठीची सुमारे ७३ कोटीच्या सुधारित पाणी योजनेचे काम आता ८० टक्के पूर्ण झाले आहे. या योजनेचे कन्सल्टिंगचे काम प्राधिकरणाला मिळाले आणि प्राधिकरणाची परिस्थिती सुधारली. चाफे- देऊड- गणपतीपुळे या तीन गावांसाठीच्या सुमारे ३० कोटीच्या पाणी योजनेचे काम प्राधिकरणाकडे आहे.