रत्नागिरी:- शहरातील नाचणे येथील हवामान केंद्रासमोर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गोडाऊनला रविवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे लोळ संपूर्ण शहरात दिसून आले. या आगीत गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेले लाखो रुपयांचे एचडीपी पाईप जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आगीची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक ५ मधील महायुतीचे उमेदवार सौरभ मलुष्टे यांनी आपला प्रचार अर्ध्यावर थांबवून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले.

आज (रविवार) सकाळी नाचणे परिसरातील हवामान केंद्रासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या जीवन प्राधिकरणाच्या गोडाऊनमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोडाऊनच्या बाहेरील बाजूस असलेल्या वाळलेल्या गवताला सुरुवातीला आग लागली होती. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ही आग वेगाने पसरत गोडाऊनच्या आतपर्यंत पोहोचली.
या गोडाऊनच्या आवारात पाणी पुरवठा योजनांसाठी वापरण्यात येणारे मोठमोठे एचडीपी पाईप्स साठवून ठेवण्यात आले होते. हे पाईप ज्वलनशील असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. यामुळे पाईप्सचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नक्की किती वित्तहानी झाली हे आग पूर्ण विझल्यानंतरच स्पष्ट होईल.
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. ही घटना घडली तेव्हा प्रभाग ५ चे महायुतीचे उमेदवार सौरभ मलुष्टे हे प्रभागात प्रचारात व्यस्त होते. मात्र, आगीची बातमी समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रचार थांबवला आणि कार्यकर्त्यांसह थेट घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून मदतकार्य वेगाने सुरु करण्यासाठी प्रयत्न केले.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला आहे. सध्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून, आग लवकरच आटोक्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.









