जीआय मानांकन रोखणार हापुसमधील भेसळ 

रत्नागिरी:-भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त उत्पादनांपैकी कोकणातील हापूस आंब्याचे सभासद नोंदणी देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. वीस दिवसांपुर्वी डाळींबची नोंदणी अधिक झाली असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. आतापर्यंत 1 हजार 365 जणांनी जीआय घेतले आहे. क्युआर कोडमुळे भविष्यात कर्नाटक आंब्याची होणारी हापूसमधील भेसळला रोख लावण्यात यश येईल असा विश्‍वास कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी व्यक्त केला.

हापूसचा हंगाम सुरु झाला असून भेसळ रोखण्यासाठी जीआय मानांकन देणार्‍या संस्था कोणत्या पध्दतीने कार्यरत आहेत, यासंदर्भात बोलताना डॉ. भिडे यांनी माहिती दिली. केंद्र सरकारने आतापर्यंत 323 जीआय मानांकन प्रमाणपत्र विविध उत्पादनांना दिली आहेत. याचा फायदा हापूसच्या उत्पादकांबरोबरच खरेदीदारांनाही होतो. कोरोना दोन वर्षे सभासद नोंदणीत अडथळा आला होता; परंतु गतवर्षी कोकण आंबा उत्पादक संघाने वेंगुर्ले, ठाणे, पालघर, अलिबाग, सिंधदुर्ग जिल्ह्यात नोंदणी शिबिरांचे आयोजन करत सभासद वाढीसाठी पावले उचलली होती. त्याला यशही मिळाले असून आतापर्यंत 1 हजार 365 सभासदांची नोंदणी झाली आहे. देशातील जीआय मानांकन प्राप्त झालेल्यांमध्ये सभासद नोंदणी सर्वाधिक असलेल्या फळांमध्ये डाळींब पहिल्या तर हापूस दुसर्‍या क्रमांकावर आहे. पुढील वर्षात जास्तीत नोंदणी करुन घेतली जाईल. गतवर्षी जीआय घेतलेल्या बागायतदारांना क्युआर कोड दिला होता. यामध्ये मुंबई, पुणेसह विविध बाजारपेठांमध्ये दहा हजार हापूसच्या पेट्या बाजारात दाखल झाल्या होत्या. क्युआर कोडमुळे बागायतदार कोण यासह सविस्तर माहिती मिळू शकते. याचा फायदा काही बागायतदारांना यंदा झाला असून राजस्थानसह विविध राज्यातील ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाला आहे. हापूसला दरवर्षी कर्नाटकी आंब्याच्या भेसळीला सामोरे जावे लागते. गतवर्षीपासून यावर रोख लागणार आहे. यंदाही दिड लाख क्युआर कोडचे स्टिकर संघातर्फे दिले जाणार आहे.

जीआय मानांकन म्हणजे काय?

विशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतकर्‍यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री मात्र ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक निर्देशन’ मानांकनातून मिळते.