जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी उच्चार होणार अधिक स्पष्ट 

लर्निंग रत्नागिरी संकल्पना अमलात; सव्वा लाख विद्यार्थाना होणार फायदा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी उच्चार स्पष्ट होण्यासाठी लर्निंग रत्नागिरी संकल्पना राबविण्याच निर्णय घेतला आहे. त्याची सुरवात शुक्रवारपासून (ता. 12) झाली. याचे नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील 21 शिक्षकांचा विचार गट तयार केला आहे. तीन वर्षाचा हा उपक्रम असून याचा फायदा सव्वा लाख विद्यार्थ्यांना होणार आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांतही दर्जेदार शिक्षण मिळावी म्हणून जिल्हा गुणवत्ता कक्षाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लर्निंग रत्नागिरी’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. इंग्रजी शिक्षण सुरु असले तरीही अनेक विद्यार्थ्यांचे उच्चार सुस्पष्ट नसतात. त्यांच्यावर त्या पध्दतीने संस्कार होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी उच्चार सुधारण्यासाठी संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. इंग्रजी शब्दांचे नियमित वाचन करुन घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे. मुख्यालयातून केंद्र प्रमुखांना व्हॉटस्अ‍ॅपवर हे शब्द दिले जातील. केंद्र प्रमुख शिक्षकांमार्फत ते विद्यार्थ्यांकडून वाचून घेतील. दररोज अशाप्रकारे सामुहीक वाचन केल्यामुळे विद्यार्थ्यांचा त्या-त्या शब्दांचा उच्चार स्पष्ट होतील. भविष्यात शब्दांबरोबरच वाक्यही दिली जाणार आहेत. इंग्रजीचे वाचन योग्य पध्दतीने व्हावे असा यामागील उद्देश आहे. याची अंमलबजावणी होते कींवा नाही याची खातरजमा शिक्षण विभागाच्या अधिकार्यांकडून होणार आहे. शाळाभेटीवेळी अधिकारी त्याची तपासणी करतील. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री. मुरकुटे यांच्याकडे दिली आहे. शुक्रवारी या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. एक दिवशीय कार्यशाळाही पार पडली. या उपक्रमासाठी 21 जणांची विशेष शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात किमान दोन शिक्षक असणार आहेत. एकूण तीन वर्षाचा उपक्रम असणार आहे. हा उपक्रम सुरू करण्यास तत्कालीन अध्यक्ष रोहन बने, शिक्षण सभापती सुनील मोरे, सदस्य दीपक नागले, पर्शुराम कदम यांचा मोलाचा वाटा होता.