जि. प. शाळांचा पट साडेचार हजारांनी घटला

जिल्ह्यात पावणेतीन हजार शाळा ; इंग्रजीसह खासगी शाळांकडे कल वाढतोय

रत्नागिरी:- जिल्ह्यात इंग्रजी, तसेच खासगी शाळांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या पटसंख्येत घट होत आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील शिक्षणाचा दर्जा टिकून असला तरी गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घट झाली आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवूनही २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ४ हजार ७०२ एवढा पट कमी झाला आहे.

विद्यार्थ्यांचा खासगी व इंग्रजी माध्यमातील शाळांकडे वाढता कल, शिक्षणक्षेत्रात वेगाने होत असलेले बदल यामुळे जिल्हा परिषद शाळांना घरघर लागली आहे. अनेक विद्यार्थी हे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळत असले, तरी याकडे मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांची संख्याही कमी नाही. ग्रामीण भागामध्ये शेती करणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी कमी होत चालली आहे. त्यामुळे नोकरीनिमित्ताने शहरी भागाकडे जाण्याचे प्रमाणही जास्त आहे. या सर्वांचा परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर होत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात ७१ हजार ८१० विद्यार्थी संख्या होती. त्यामध्ये २०२२-२३ मध्ये १ हजार ४२१ विद्यार्थ्यांची भर पडली होती. त्यामुळे गतवर्षी विद्यार्थी संख्या ७३ हजार २३१ झाली होती. मात्र, चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विद्यार्थी संख्येत कमालीची ४ हजार ७०२ ने घट झाली आहे. यंदा विद्यार्थी संख्या ६८ हजार ५२९ आहे. कोरोना कालावधीत चाकरमाना कुटुंबांसह गावी परतल्यामुळे या शाळांचा पट वाढला होता. आता पुन्हा पट घटत असल्याने या शाळांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. त्यासाठी शिक्षण विभागासह शिक्षक मेहनत घेत असल्यानेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी इस्रो आणि ‘नासा’मध्ये जाण्याची झेप घेतली होती. तरीही विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शिक्षकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. नोकरीसाठी ग्रामीण भागात कोणतेही पर्याय नसल्याने शहरीकरण वाढले आहे. त्याचबरोबर छोटे कुटुंब ही संकल्पना ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी कमी होत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक हे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा व स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शोध घेत असतात. चिरेखाणीवरील कामगारांची मुले, तसेच रस्ता कामगारांच्या मुलांना शाळेत आणण्यासाठी त्यांच्या पालकांचे शिक्षकांकडून प्रबोधन करण्यात येत आहे.