जि. प. पदाधिकाऱ्यांची मुंबई वारी पावणार; लवकरच शिक्षकांच्या रिक्त जागा भरणार

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील विविध समस्यांबाबत दोन आठवड्यापूर्वी अध्यक्ष रोहन बने यांन केलेल्या मंत्रालयातील वारीचे फळ लवकरच पदरात पडणार आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्यादृष्टीने शिक्षण विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत. पोर्टलद्वारे भरती अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना रत्नागिरी जिल्ह्यात रिक्त पदांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

अध्यक्ष रोहन बने यांनी ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री, महिला व बालकल्याणमंत्री यांची भेट घेवून विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यासाठी त्यांनी दोन वेळा मंत्रालयाची वारी केली होती. शिक्षण विभागात शिक्षकांची असलेली रिक्त पदे भरली जावीत यासाठी शिक्षण मंत्र्यांना साकडे घातले होते. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घडवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी शिक्षण सभापती सुनिल मोरेही उपस्थिती होते. मुंबई, ठाणे, पालघरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रत्नागिरी जिल्ह्यात करण्याबाबत पावले उचलण्यात आली आहेत. तशा सूचनाही दिल्या गेल्याआहेत. जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत ते इच्छूक असल्यास त्वरित अर्ज सादर करावा, असे पत्र शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी काढले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, जिल्ह्याला शिक्षक मिळणार आहेत. शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होतो. कामकाज चालवताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामध्ये ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागते. या निर्णयामुळे शिक्षण विभागाला दिलासा मिळाला आहे. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरीही ऑनलाईन शिक्षण सुरुच आहे.