जि.प.,पं.स.च्या निवडणूका फेब्रुवारीपूर्वी घेण्याची मागणी

शिष्टमंडळाने घेतली राज्य निवडणूक आयुक्तांची भेट

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तातडीने घेण्याची मागणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आजी-माजी पदाधिकारी आणि सदस्य असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या शिष्टमंडळाने केली आहे. असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन सादर केले.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या चार वर्षांपासून रखडल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक विकास योजना ठप्प झाल्या असून नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत. असे असतानाही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही.
राज्य सरकारने जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण यांची रचना अंतिम केलेली आहे, गट आणि गण यांचे आरक्षण देखील अंतिम झाले आहे, निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट, पंचायत समिती आणि पंचायत समिती गण प्रमाणे मतदार यादी देखील अंतिम केली आहे, विविध याचिका दाखल झाल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने कुठेही निवडणुकीला स्थगिती न देता ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तातडीने जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर करावी, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली.
निवेदन स्वीकारल्यानंतर निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांबरोबर दोन दिवसांत बैठक घेणार आहे.निवडणूक आयुक्तांनी नमूद केले की, महानगर पालिकांच्या निवडणुकां सोबतच, जिथे ५० टक्क्यांच्या आत आरक्षण आहे, अशा १२ जिल्हा परिषदेची निवडणूक ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचा प्रयत्न आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. गट, गणांची रचना, जिल्हा परिषद सदस्य संख्या, आरक्षण आणि अधिनियमात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्यामुळे या प्रक्रियेत राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची आहे.
यावेळी शिष्टमंडळात कैलास गोरे पाटील (सोलापूर), सुभाष घरत (माजी उपाध्यक्ष ठाणे), उदय बने (माजी उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा परिषद), शरद बुट्टे पाटील (माजी सभापती पुणे जिल्हा परिषद), अमोल पवार (उपसभापती, पंचायत समिती खेड), भारत शिंदे (माजी सभापती सोलापूर), प्रभाकर सोनवणे (माजी सभापती जळगाव), नितीन मकाते (जिल्हा परिषद सदस्य सोलापूर), गोपाल कोल्हे (जिल्हा परिषद सदस्य अकोला), अरुण बालघरे (जिल्हा परिषद सदस्य सांगली), शिवाजी मोरे (जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर), विकास गरड, आणि सुधाकर घोलप यांचा समावेश होता.
या मागणीमुळे ग्रामीण भागातील निवडणुकांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोग आणि राज्य सरकार कधी निर्णय घेते, यावर जिल्ह्या-जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.