रत्नागिरी:- कोविडचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावरही झाला आहे; मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शहरी भागातीलच नव्हे तर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्यास सुरवात केली आहे. भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या गावात मोबाईलला रेंज नसली तरीही शिक्षणात खंड पडलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात 2,930 शाळा आहेत. त्यातील 2,676 शाळात ऑनलाईन शिक्षण सुरु असून 255 शाळातील विद्यार्थ्यांना गृहभेटीतून शिकवले जात आहे. कोरोनाच्या संकटातही शिक्षकांचे ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरु ठेवले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 75 हजार विद्यार्थी असून सहा हजार शिक्षक आहेत. बहूतांश शिक्षकांनी कोरोना कालावधीतही शिक्षणाचे कामकाज न थांबवता विविध पर्यायांचा उपयोग करुन विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा फंडा अवलंबला आहे. त्यात ऑनलाईन अभ्यासक्रमाची कास धरली. सह्याद्रीचा टीलीमीली कार्यक्रम शिकवणीचा मार्ग आहे. दिक्षा अॅपवरील अभ्यासक्रमाचे व्हीडीओ विद्यार्थ्यांना मोबाईलवर व्हॉटस्अॅपद्वारे पाठवले जातात. ज्यांच्याकडे अॅड्रॉईड मोबाईल नाहीत, पण साधे मोबाईल आहेत त्यांच्याशी शिक्षक संवाद साधतात. सराव प्रश्नपत्रिका तयार करुन त्या व्हॉटस्अॅपवरुन सोडवून घेण्यात येतात. त्याचे मुल्यमापन करुन त्रुटी सोडवल्या जात आहेत. व्हॉटस्अॅप नसलेल्या आणि कोरोना प्रादुर्भाव नाही गावात स्वतः शिक्षक प्रश्नपत्रिका पोच करत आहेत. अॅड्रॉईड मोबाईल नसलेल्या भागात शिक्षकांच्या गृहभेटीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना समोर बसवून पाठ घेतला जात आहे.
ऑनलाईन शिक्षण सुरु असलेल्या 2,676 शाळांपैकी 2,354 शाळा जिल्हा परिषदेच्या तर 322 खासगी शाळा आहेत. ऑनलाईन सुविधा नसलेल्या 207 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. रत्नागिरी तालुक्यात 317 जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे 825 शिक्षक कार्यरत आहेत. कोरोनामुळे परिस्थिती बिघडली आणि शिक्षणात खंड पडला. तालुक्यात सुमारे 18 हजार विद्यार्थी आहेत. ऑनलाईनचा वापर न करणारे 50 टक्के तर साधे मोबाईल असलेले 20 टक्के विद्यार्थी आहेत. 30 टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण गृहभेटीतूनच सुरु आहे. रत्नागिरी तालुक्यात रेंज नसलेले कळझोंडी, आगरनरळ, गडनरळ, डोर्ले, कुर्धे, गणेशगुळे गावातील काही भाग आहेत. जिथे मोबाईलला रेंजच नाही. तिथे गृहभेटीचा पर्याय शिक्षकांनी अवलंबला आहे. 2012 साली तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी राबवलेल्या तंत्रस्नेही शिक्षकांच्या मोहिमेचा लाभ सध्या कोरोनाच्या परिस्थितीत अनेक शिक्षकांना होत आहे.