जि. प. च्या ८१५ विद्यार्थ्यांचे आधार अपडेट शिल्लक

दूरूस्तीत अडचणी: १२ शाळांसाठी एक सेवा केंद्र

रत्नागिरी:- जिल्ह्यातील मराठी शाळामधील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेटचे काम आता ९९.६४ टक्के पुर्ण झाले आहे. तरीही ८१५ विद्यार्थ्यांच्या आधार अपडेटच्या कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळात शंभर टक्के आधार अपडेटचे काम पूर्ण होणे आता कठीण झाले आहे.

राज्य शासनाने राज्यातील सर्व मराठी शाळांमधील विद्यार्त्यांच्या आधारावर शाळेला शिक्षक देण्याची मोहीम हाती घेतली आहे. या घोषणेनंतर अनेक ठिकाणी मुलांची संख्या वाढवून दाखवण्यासाठी बनावट पद्धतीने मुलांची नावे टाकून शिक्षकांनी मागणी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याला आळा घालण्यासाठी आधार नोंदणीद्वारे शाळेतील मुलांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये विद्यार्थ्यांचे आधार नोदणी करण्याची मोहिम हातात घेण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व आधार अपडेटची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे ३ हजार शाळांमध्ये हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. १२ शाळांसाठी एक केंद्र अशी आधार नोंदणी व अद्ययावत करण्यासाठीची केंद्र केली आहेत. फोटो न जुळणे, नावांची स्पेलींग दूरूस्ती किंवा जन्म तारीख दूरूस्ती तसेच काही विद्यार्थ्यांचे हाताचे ठसे न जुळणे अशा त्रुटी असतात. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित शाळेतील शिक्षकांकडून सूचना दिली जाते. तसेच लवकरात लवकर हे अपडेट करण्याचे काम पुर्ण करण्याची विनंतीही केली जाते. मात्र काही मुलांचे हाताचे ठसे ४ ते ५ वेळा प्रयत्न करुनही अपडेट करण्यात अडचणी येत आहेत.

३ हजार १९९ विद्यार्थ्यांच्या नोंदीत त्रुटी

४ मे २०२३ पर्यंत जिल्ह्यातील २ लाख २३ हजार ६४ विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यात आले आहे. तर ८१५ मुलांचे काम अपूर्ण आहे. जिल्ह्यातील एकूण विद्यार्थ्यापैकी २ लाख २० हजार ४५० विद्यार्थ्यांचे आधार जुळणी पुर्ण होऊ शकली. आधार जुळणीत ७७ मुलांचे फोटो जुळलेले नाहीत, तर १ हजार ८२८ मुलांची नावे आधारमध्ये जुळत नाहीत. ७६ विद्यार्थ्यांच्या स्त्री व पुरुष अशा नोंदी चुकलेल्या आहेत. जिल्ह्यातील ४०६ विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेची नोंद आधारकार्डवर चुकीची आहे. एकूण ३ हजार १९९ विद्यार्थ्यांच्या नोंदी न जुळल्याचे आढळत आहे