जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण

सातव्या टप्प्यात ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या दोन-तीन दिवसांत होणार आहेत. त्यासाठी ११८ शिक्षकबदलीपात्र आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रतिक्रिया जूनमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे बदल्यांची प्रक्रिया सुरू होण्यास जुलै महिना उजाडला. संवर्ग १ मध्ये दिव्यांग शिक्षक, गंभीर आजारी, अपंग, विधवा, परितक्त्या, ५३ वर्षांवरील शिक्षक यांचा समावेश होता. त्याचबरोबर संवर्ग २ म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत पात्र असलेल्या शिक्षकांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले.

संवर्ग ३ मध्ये अवघड क्षेत्रातील बदलीसाठी पात्र ठरलेल्यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने निश्चित केलेली अवघड क्षेत्रातील शाळांची यादी यासाठी ग्राह्य धरण्यात आली. संवर्ग ४ मध्ये बदलीपात्र शिक्षकांचा समावेश करण्यात आला. एकाच शाळेत पाच वर्षे काम आणि अवघड क्षेत्रात १० वर्षे काम केलेल्या शिक्षकांचा समावेश करण्यात आला.

जिल्ह्यातील १ हजार १०० शिक्षक बदलीपात्रच्या यादीत होते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी महिन्याचा कालावधी लोटला आहे. या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत ४६४ शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे.