जिल्ह्यात 25 जूनपर्यंत अति मुसळधार पावसाचा इशारा 

रत्नागिरी:- मान्सून संथ गतीने दाखल झाल्यानंतर आता  कोकण विभागात हळूहळू जोर धरू लागला आहे. कोकण किनारपट्टीतील सर्वच जिल्ह्यांत मोसमी पावसाच्या सक्रियतेत मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. दि. 25 जूनपर्यंत कोकण किनारपट्टी भागात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता  आहे. अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मोसमी पावसाने सध्या कोकणाचा  बहुतांश भाग व्यापला आहे. अरबी समुद्रातून काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टी आणि प्रामुख्याने दक्षिण कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्यांसह मुंबईत काही भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोकणच्या दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणामध्ये 25 जूनपर्यंत काही भागांत वादळी वार्‍यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतील घाट विभागांत काही ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुढील तीन  दिवस कोकणातील विविध भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून त्यानंतरच्या तीन दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना  रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख खरीप लागवड पट्ट्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. तापमानही दोन ते चार अंशाने खाली आल्याने हवेत गारवा आला आहे. शेतकर्‍यांनी खरिपाची पेरणी ची तयारी पूर्ण केली आहे. येत्या चार दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने लावणीची जुळाजुळव आता सुरू करण्यात आली आहे.

 चार दिवसांत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा या ठिकाणी ताशी ४०-५० कि.मी ते ६० कि.मी. वेगाने यादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला असून मच्छीमारानी संबधीत कालावधीत समुद्रात जावू नये. तसेच 20 जून ते 25 जून 2022 या कालावधीत  रत्नागिरी जिल्हयात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी  नागरिकांना सावधानतेचा व सुरक्षितता बाळगावी. संबंधित कार्यक्षेत्रातील सर्व मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.