जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले ! बळीराजा सुखावला

रत्नागिरी:- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. उन्हाच्या कडाक्यामुळे होरपळलेली भातशेती दिवसभर पडलेल्या पावसाने तरारली आहे. भातशिवारात पाणी साचले आहे. उन्हामुळे भात करपण्याची बळीराजाची चिंता दूर झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पूढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही परिस्थिती जैसे थेच राहिली. 1 सप्टेंबरला तर पाऊसच झाला नाही. गुरूवारी सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि हलके वारे समुद्रकिनारी भागात वाहत होते. रात्री हलका पाऊसही पडून गेला; परंतु त्यात जोर नव्हता; मात्र शुक्रवारी पहाटेपासून वेगवान वार्‍यासह जोरदार सरी कोसळू लागल्या. हा पाऊस सर्वत्र झाला आहे. मागील सुमारे दोन आठवड्याहून अधिक काळानंतर जिल्ह्यात शुक्रवारी दोन अंकी सरासरी पाऊस नोंदला गेला. रत्नागिरी शहरात मारूती मंदिर, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जेलनाका, जयस्तंभ परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी होते. या पावसामुळे हवेतही गारवा निर्माण झाला. उन्हाच्या कडाक्यामुळे गर्मीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दुपारपर्यंत संततधार सुरू होती. त्यानंतर विश्रांती घेतली; पण ढगाळ वातावरण होते.

हा पाऊस सर्वत्र पडल्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू लागली तर धबधबे प्रवाहित झाले होते. पाऊस नसल्याने भातेशतीवर मोठा परिणाम झाला होता. उत्पादनातही घट होईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. याचा सर्वाधिक फटका कातळावरील दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्राला बसला आहे. अनेक ठिकाणी शेतं पिवळी पडली असून, शेंडे करपून गेले. वातावरणातील बदलांमुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचे गणितचे बदलून गेले असतानाच आज पडलेल्या पावसाने दिलासा दिला आहे. हा पाऊस असाच चार दिवस तरी पडत राहावा, अशी आशा बळीराजाकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शुक्रवारी (ता. 8) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासात सरासरी 38.67 मिमी पाऊस झाला. त्यात मंडगणड 50, दापोली 75, खेड 26, गुहागर 68, चिपळूण 40, संगमेश्‍वर 8, रत्नागिरी 23, लांजा 33, राजापूर 25 मिमी नोंद झाली. 1 जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 2621 मिमीची नोंद झाली आहे; परंतु गतवर्षी याच कालावधीत 3055 मिमी सरासरी पाऊस झाला होता. 400 मिमीची तफावत अजूनही दिसत आहे.