अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत
रत्नागिरी:- हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मंगळवारी जिल्ह्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. दुपारी काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळ नंतर जोर वाढवला. सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या लखलखाटासह वादळी पावसाने तुफान हजेरी लावली. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती. मुंबई – गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते तर कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या उशिराने धावत होत्या.

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. रविवारी सकाळी तासभर कोसळल्या नंतर पाऊस गायब झाला होता. मागील दोन दिवस रत्नागिरीच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. सोमवारी दिवसभर आणि मंगळवारी दुपारपर्यंत उकाड्याने रत्नागिरीकर हैराण झाले होते. अशातच मंगळवारी दुपारी अचानक आकाशात काळया ढगांनी गर्दी केली आणि दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. दुपारी दोन तास पावसाच्या सरींनी उकडा दूर करून हवेत गारवा निर्माण केला. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वदूर सलग दोन तास पावसाने हजेरी लावली.
दुपारी दोन तास हजेरी लावल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा आकाशात काळया ढगांनी गर्दी केली. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरवात झाली. यावेळी पावसासोबत ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट देखील सोबत होता.सायंकाळी साडेपाच वाजता मुसळधार पावसाने रत्नागिरीकरांची धावपळ उडवून लावली. सरकारी कार्यालय सुटल्यानंतर अनेकजण मुसळधार पावसामुळे कार्यालयातच अडकले. तर बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले अनेकजणाची मुसळधार पावसामुळे फजिती झाली.
सलग कोळसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरात अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले. राम आली, गोखले नाका, स्टेडियमच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते. पावसासह वादळी वारे देखील वाहत असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वीज गायब झाली होती.
वादळी पाऊसामुळे नौका बंदरांच्या आश्रयाला
मंगळवारी दुपार नंतर वादळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पावसाचा इशारा मत्स्य विभागाकडून मच्छीमारांना यापूर्वीच देण्यात आला होता. मच्छीमारांनी देखील त्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या होत्या. मंगळवारी दुपारी पावसाचे वातावरण तयार होताच अनेक नौकांनी प्रमुख बंदरांचा आश्रय घेतला. जयगड, हर्णे, मिरकरवाडा, पावस, नाटे, दाभोळ या ठिकाणी मासेमारी नौकानी मोठी गर्दी केली होती. पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने मासेमारी दिवस ठप्पच राहण्याची शक्यता आहे.
मुंबई – गोवा महामार्गावर चिखलाचे साम्राज्य
महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कासवगतीने होणारी वाहतूक, जागोजागी पडलेले खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे सद्या महामार्गाची वाट बिकट बनली आहे. मंगळवारी आलेल्या पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी सध्या चिखलामुळे घसरगुंडीचे डाव रंगले आहेत. वाहनचालकांना विशेषकरून मोटारसायकलस्वारांना वाहन चालवणे जिकिरीचे बनले आहे. छोटे-मोठे अपघातही होत आहेत. प्रशासनाने मात्र डोळेझाक करत गांधारीची भूमिका घेतली आहे. संबंधित ठेकेदाराने मात्र काम करताना योग्य काळजी न घेतल्याने अपघाताचे प्रमाण हे वाढतच निघाले आहे. मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहन चालवणे अधिक धोकादायक बनले आहे.