रत्नागिरी:- सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील सुचनेनुसार मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली दिनांक 08.01.2021 रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी कोविड 19 लसीकरण ड्रायरन मोहिम राबविण्यात आली.
या कोविड 19 लसीकरण ड्रायरन मोहिमेमध्ये 75 लाभार्थींची प्राथनिधिक स्वरुपात तालिम घेण्यात आली. यामुळे कोविड 19 च्या येऊ घातलेल्या लसीकरण मोहिमेसाठी सुयोग्य अंमलबजावणीसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज झाला आहे. रत्नागिरी जिल्हयामध्ये 1) सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी, 2) उपजिल्हा रुग्णालय दापोली व 3) प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा अशा एकुण तीन ठिकाणी कोविड 19 लसीकरण ड्रायरन मोहिम राबविण्यात आली.
सदर कोविड 19 लसीकरण ड्रायरन मोहिमेसाठी दिनांक 07.01.2021 रोजी पासूनच पूर्वतयारी म्हणून मा.डॉ.श्रीम.बी.एस.कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा, ता.जि. रत्नागिरी येथे कोविड 19 लसीकरण संदर्भात ड्रायरनचे आयोजन करण्यात आले. या लसीकरण ड्रायरन मोहिमेचे उदघाटन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.श्रीम.इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमावेळी मा. डॉ. श्रीम. बी. एस. कमलापूरकर -जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, श्री.डॉ.एम.डी. गावडे- तालुका आरोग्य अधिकारी, तालुका रत्नागिरी, डॉ. श्री. ओंकार दे. निमकर व डॉ. श्रीम. स्वप्नल प्र.साळवी- वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र हातखंबा हे लसीकरण ड्रायरन मोहिमेला उपस्थित होते. कोविड 19 लसीकरण ड्रायरन मोहिमेमध्ये 75 डमी लाभार्थ्यांची नोंदणी करुन लाभार्थ्यांना मेसेजव्दारे लसिकरणाचे ठिकाण व वेळ अगोदर कळविण्यात आली. लसीकरण बुथवर आलेल्या लाभार्थ्यांचे सुरुवातीला नोंदणी करुन संबंधीत लाभार्थ्यांना लसीकरण कक्षात पाठविण्यात आले. लसीकरण कक्षामध्ये संबंधीत लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी करुन लसीकरण केल्यानंतर देखरेख कक्षामध्ये ठेऊन अर्धा तास निरिक्षणाखाली ठेवण्यात आले. काही गुंतागुंत नसेल अशा लाभार्थ्यांना डिस्चार्ज करण्यात आले.
लसीकरण ड्रायरन मोहिमेमध्ये श्रीम. डी. डी. जोशी, श्रीम.डी.डी.सुर्वे, श्री.डी.डी.गोताड, श्री.एस.अे.चव्हाण यांनी व्हॅक्सिनेशन ऑफिसर म्हणून काम केले. तर श्रीम.व्ही.एस. देसाई यांनी व्हॅक्सिनेटर म्हणून काम केले.