नूतन सीईओ डॉ. जाखड यांनी स्वीकारला पदभार
रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून बाहेरून येणार्यांना क्वारंटाईन करण्यावर सर्वाधिक भर दिला जाईल. स्थानिक लोकांमध्ये संक्रमण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देऊ, असा विश्वास नुतन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तसेच जिल्ह्यातील अडीअडचणींचा आढावा घेऊन व्हीजन निश्चित करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
डॉ. इंदूराणी जाखड यांनी नागपूरला प्रोबेशन कालावधी पूर्ण केल्यानंतर गडचिरोलीत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. तेथील जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरही त्यांनी काही महिने काम केले होते. रत्नागिरीत बदली झाल्यानंतर सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर मंगळवारी डॉ. जाखड यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. त्यामध्ये शिक्षण, महिला बालकल्याण विभागासह अन्य खात्यात रिक्त जागा अधिक असल्याचे दिसून आले. जिल्ह्याचा सर्वागिण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.









