रत्नागिरी:- यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शेतकर्यांनी पेरणीची कामे उरकली आहेत. जिल्ह्यात एकूण 68 हजार 88.37 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येते.
सध्या भाताची रोपे काढून लागवड करण्यात येणार्या क्षेत्राची पूर्व मशागत म्हणून नांगरणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात दुय्यम पीक म्हणून नागलीची लागवड केली जाते. 10,398 हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड करण्यात येते. तूर, मूग, उडीद मिळून एकूण कडधान्यांची 744.25 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. तसेच भुईमूग, तीळ, कारले मिळून एकूण गळीतधान्याची 150.62 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. 41.66 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते. एकूण खरीप हंगामात 79 हजार 913.31 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात येत आहे.
शेतीचा हंगाम सुरू असल्याने जिल्ह्यासाठी 14 हजार मेट्रिक टन खत मंजूर आहे. आतापर्यंत आठ हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. भात, नागलीसह अन्य पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. ज्या शेतकर्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत त्यांनी लागवड करणार्या जमिनीची मशागत म्हणून नांगरणी सुरू केली आहे.