जिल्ह्यात 62 टक्के भातलावण्यांचे काम पूर्ण 

रत्नागिरी:- मोसमी पावसाने कोकणात जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात समाधानकारक वाटचाल केल्या नंतर आता पावसाचा जोर ओसरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या तुलनेत 55 टक्के मजल मारली आहे. पुढील चार दिवसांसाठी रत्नागिरीत ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील खरीप क्षेत्रात  समाधानकारक स्थिती असून, आतापर्यंत 62 टक्के लावण्या पूर्ण झाल्या आहेत.

जिल्ह्यात मोसमी पाऊस नियमित वेळी पडण्याचा अंदाज होता. मात्र, मोसमी पावसाच्या आगमनासाठी कोकणात प्रतीक्षा करावी लागली. परिणामी पेरणीची कामेही उशिराने सुरू झाली. काही शेतकर्‍यांनी पावसाचा अंदाज घेऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या आटपून घेतल्या होत्या. पाऊस लांबल्यामुळे ते शेतकरी दुबार पेरणीच्या सावटाखाली होते. 10 जूनपासून मोसमी पावसाला प्रारंभ झाला. जून महिन्यात पावसाने पाठ फिरविली होती. जवळपास जून कोरडा जाण्याच्या तयारीत असातना मोसमी पाऊस सक्रिय झाला. जुलै महिन्यात  मुसळधार पावसाला सुरुवात होऊन तो सर्वदूर पसरला. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी भरून काढली. त्यामुळे खेड, दापोली, चिपळूण, राजापूरसह रत्नागिरी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती.
जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे एक आठवडा रखडलेल्या भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात 70 हजार हेक्टरवर भात लागवड होते. आतापर्यंत 62 टक्क्यांहून अधिक भात लावण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. नदी किनारी भागातील भात लावण्या पूर परिस्थितीमुळे थांबल्या होत्या. त्याही सुरू झाल्या आहेत. मागील आठवड्यातील शेवटच्या चार दिवसात सरींवर सरी पडत आहेत. त्याचा परिणाम पाणी नसलेल्या भागातील म्हणजेच कातळावरील किंवा डोंगराळ भागातील भात लावण्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात भात पिकासाठी समाधानकारक स्थिती आहे. लावण्यांची कामे वेगाने सुरु आहेत. पाऊस कमी झाल्यामुळे शेतात  अतिरिक्त गवत किंवा रान माजण्याची शक्यता आहे, त्यामुळे खुरपणीची कामेही लवकरच सुरू होतील.