जिल्ह्यात 2 हजार घरकुलांची कामे सुरू

3 हजार 318 घरकुल उभारणार, 60 टक्के कामे सुरू

रत्नागिरी:- शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत मंजूर घरे शंभर दिवसात पूर्ण करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या; मात्र दोन महिने झाले तरीही साठ टक्केच घरांची कामे सुरु करण्यात संबंधित विभागाला यश आले आहे. जिल्ह्याला 3 हजार 318 घरांचे लक्ष असून आतापर्यंत 2 हजार घरांची कामे सुरु करण्यात आली आहे.

दारिद्रयरेषेखालील कुटूंबियांनासाठी अनुदानावर घरकुले उभारण्यात येतात. त्यांच्यासाठी एक लाख 20 हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. कोरोनामुळे यंदा या योजनेचा बोजवारा उडाला होता. त्यामधून मार्ग काढत घरकुल योजनेला निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यासाठी शंभर दिवसांची अट घातली आहे. 20 नोव्हेंबरला या योजनेचा कालावधी सुरु झाला आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत घरकुलांची कामे पूर्ण करावयाची आहेत. कोरोनामुळे चिरे, वाळू उत्खननाचे काम थांबलेले होते. या दोन्ही वस्तू मिळण्यात अनंत अडचणी निर्माण होत होत्या. वाळूवरील रॉयल्टीवरुन काही दिवसांपुर्वी गोंधळ सुरु होता. त्यामुळे उत्खननही थांबलेले होते. त्याचा फटका घरकुल योजनेला बसला असून दिलेल्या कालावधीत घरकुले पूर्ण होणे अशक्य आहे. वाळूचा तुटवडा जाणवू नये यासाठी तहसिलपातळीवरुन उपाययोजना करण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. तोपर्यंत जिल्ह्याला मिळालेल्या लक्षांकातील 2 हजार घरांच्या कामांना मंजूर देण्यात आली होती. ती कामे सुरु झाली असून महिन्याभरात घरे पूर्ण होतील; परंतु अजुनही काही घरांची कामेच सुरु झालेली नसल्याने सुमारे चाळीस टक्के घरे शंभर दिवसात पूर्ण करणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, रमाई योजनेंतर्गत जिल्ह्याला निधी प्राप्त झालेला असून गेल्या दोन वर्षातील 1800 कामांना चालना मिळणार आहे. यामधून लाभार्थ्याला एक लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जाते. 2019-20 या वर्षातील 300 घरांचे प्रस्ताव असून त्यापुर्वीचे 1500 प्रस्ताव प्रलंबित आहेत. निधी मंजूर झाल्यामुळे या सर्व कामांना चालना मिळणार आहे.