जिल्ह्यात 15 हजार 161 रेशन कार्डधारकांचा धान्य पुरवठा बंद

पाच महिने धान्य न उचलल्याचे कारवाई 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाच्या काळात शासनाने अनेक महिने मोफत धान्य वाटप करून गरीब कुटुंबियांना मोठा आधार दिला; मात्र या कालावधीमध्ये जिल्ह्यात उलट चित्र दिसून आले. सलग पाच महिने धान्य न उचलणारी कुटुंबे थोडी थोडकी नव्हे तर 15 हजार 161 रेशन कार्डधारक आहेत. नियमाने 5 महिने धान्य उचल न केल्याने त्यांचा धान्यपुरवठा जिल्हा पुरवठा विभागाने बंद केला आहे. 

रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास धान्यपुरवठा बंद करण्यात येणार आहे, असे राज्याच्या अन्न-धान्य पुरवठा अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने याबाबतची मोहीम हाती घेतली. जिल्ह्यात अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना आधार लिंक 86.80 टक्के तर प्राधान्य कुटुंबामधील रेशनकार्ड आधाराचे लिंक अपडेट 87.50 टक्के झाले आहे. उर्वरित रेशनकार्डधारकांना आधार अपडेट करण्यासंदर्भात पुरवठा विभागाने सूचना केली आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणार्‍या सर्व कार्डधारकांना आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 3 लाख 49 हजार 390 लाभार्थ्यांचे आधार लिंक झाले आहे. अद्याप 6 हजार 642 अधिक लाभार्थीचे आधार लिकिंग होणे बाकी आहे.

आधार लिंक आहे, मात्र सलग पाच महिने धान्य उचल न केल्याने 15 हजार 161 रेशन कार्डधारकांचे धान्य बंद करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा विभागाने ही माहिती दिली. मात्र ज्यांना धान्य हवे असेल त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून व एक अर्ज भरून पुन्हा धान्य पुरवठा सुरू केला जातो, तशा सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत.