रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून 14 जुलैपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी 26 मे रोजी एका वृत्तवाहिनीवरून प्रेषित पैगंबर मुहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह, अपमानास्पद वक्तव्य केले. नवीन जिंदाल यांनी त्यासंबंधी ट्विट केल्याने त्याचे पडसाद जिल्ह्यात देखील उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर 14 दिवसांसाठी रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील काही मुस्लिम संघटनांकडून या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला आहे. आगामी काळात दोन समुदायांमध्ये लोक एकत्र आल्यास त्यादरम्यान तणाव निर्माण होऊ नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांकडून गैरफायदा घेऊन बदलत्या राजकीय परिस्थितीचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत यासाठी आदेश जारी करण्यात आले आहेत. 10 जुलैला बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही सण साजरे होत असल्याने या घटनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 1 ते 14 जुलै पर्यंत मनाई आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी काढले आहेत.









