रत्नागिरी:- हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून जिल्ह्यात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याचे प्रमाण असेल. यामुळे 10 व 11 जून या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यु लावण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 7 जून ते 11 जून या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 10 व 11 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 11 जूननंतर देखील पावसाचा धोका कायम असेल असे जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले. या कालावधीत जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगर पालिका आणि 31 गावे धोकादायक व पुरबधित आहेत. या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच या भागातील नागरिक व ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
किनारी भागात हाय टाईड आणि पाऊस याचा धोका असल्याने किनारी भागातील ग्रामस्थांचे स्थलांतर केले जाईल. पुराचा धोका लक्षात घेऊन जनावरांना न बांधता ठेवणे, बोटी सुसज्ज ठेवणे, कुशल मनुष्यबळ तैनात ठेवणे, लाईफ बोया व इतर सामग्रीची तजवीज करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
कोविड सेंटरच्या ठिकाणी वीज खंडित झाल्यास जनरेटर पुरवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच ऑक्सिजन बफर साठा देखील ठेवण्यात येणार आहे.