रत्नागिरी:- जि.प.कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात सुमारे 4500 ‘कच्चे बंधारे’ बांधण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे. या मोहिमेला जिल्ह्यत प्रारंभ करण्यात येऊन आतापर्यंत लोकसहभागातून 1 हजार 235 बंधारे पूर्णत्वास गेल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाभरात गतवर्षी सुमारे 4800 कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी जिल्हा परिषद प्रशासनस्तरावर आली होती. मात्र यावर्षी देखील जिल्हास्तरावर गावपातळीवर टंचाईनिवारणासाठी पत्येक ग्रामपंचायत स्तरावर सूचना करण्यात आल्या आहेत. आगामी काळात पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याच्या शक्यतेने प्रशासनानेही त्यावर मात करण्यासाठी तयारी केली आहे. त्याचा परिणाम उन्हाळयाच्या काळातील पाणीटंचाईनिवारणासाठी हातभार लागणार आहे. पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजना करून उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईचे संकट काहीकाळ लांबणीवर जाण्यास या बंधाऱयांचा उपयोग होणार आहे.
उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईचे संकट लक्षात घेत लोकसहभागातून बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले. त्या मोहिमेला जिल्हाभरात प्रारंभ देखील करण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसहभागातून किमान 10 तरी बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात आले असल्याचे जि.प.कृषी अधिकारी स्तरावरून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 235 बंधारे पूर्णत्वास गेलेले आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात 4 वनराई, 9 विजय, तर 24 कच्चे बंधाऱयांचा समावेश आहे. दापोली तालुक्याने या मोहिमेत मोठी आघाडी घेतली आहे. या तालुक्यात 12 वनराई, 271 विजय तर 213 कच्चे बंधारे बांधण्यात आले आहेत. खेड तालुक्यात उदासिनता दिसून येत असून 2 विजय तर फक्त 13 कच्चे बंधारे उभारण्यात आले आहेत. चिपळूणमध्ये 9 वनराई, 51 विजय, 89 कच्चे बंधारे बांधण्यात आले आहेत. गुहागर तालुकादेखील पिछाडीवर असून 6 वनराई, 60 विजय तर 17 कच्चे बंधारे बांधण्यात आले आहेत. संगमेश्वर तालुक्यात 33 वनराई, 15 विजय तर 76 कच्चे बंधारे उभारण्यात आलेत. रत्नागिरी तालुक्यात 51 वनराई, 11 विजय, तर 86 कच्चे बंधारे बांधले आहेत. लांजामध्ये 12 वनराई, 51 विजय बंधाऱयांचा समावेश आहे. राजापूरमध्ये 26 वनराई, 2 विजय तर 92 कच्चे बंधाऱ्यांची उभारणी झाली आहे.