एमआरईजीएस योजनेला चांगला प्रतिसाद
रत्नागिरी:-कोरोना काळात अनेक चाकरमानी कोकणात गावाकडे वळल्यामुळे सलग दुसर्या वर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरईजीएस) फळबाग लागवडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा 15 जुलै अखेरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 1 हजार 229.16 हेक्टरवर आंबा, काजूची लागवड केली गेली आहे.
रत्नागिरी फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषीत झालेला आहे. त्यानुसार स्थानिक फळझाडांच्या लागवडीला चालना दिली जात आहे. दहा वर्षांपुवी तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेत एमआरईजीएसमधून दहा हजार हेक्टर वर आंबा, काजूच्या लागवडीसाठी पावले उचलली होती. त्यात यशही मिळाले आहे. गेल्या दहा वर्षात 15 हजार हेक्टरवर लागवड करण्यात यश आले आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यामुळे सर्वच व्यवहार थंड पडले. अनेक मुंबईकर चाकरमान्यांनी गावाकडे धाव घेतली. घरी बसून काम नसल्यामुळे पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी काहींनी पावले उचलली. काहीजणांनी भातशेती केली तर अनेकांनी फळ लागवडीला प्राधान्य दिले. डोंगर, माळरानावर आंबा, काजूची नवी रोप लावण्यास सुरवात झाली आहे. गतवर्षी जिल्हा कृषी अधिक्षक विभागाकडून सुमारे दोन हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. त्यात काजू रोपांचे प्रमाण अधिक होते. यंदाही फळ लागवडीकडे लोकांचा कल असून आतापर्यंत 1 हजार 229 हेक्टरवर लागवड झाली आहे. सध्या भातशेतीची कामे असल्यामुळे फळ झाडांकडे लक्ष नाही. जुलै महिन्याच्या अखेरीस भातशेतीची कामे आटोपल्यानंतर रोपांची लावगड सुरु होते. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत यावर्षी मोठ्याप्रमाणात यश येईल. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही एमआरईजीएस अंतर्गत येणार्या कामांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले आहे. तालुकास्तरावर होत असलेल्या बैठकांमध्येही ते याबाबत अधिकार्यांशी आणि सदस्यांशी चर्चा करत आहेत.









