जिल्ह्यात 1 लाख 15 हजार बाप्पांना आज निरोप 

रत्नागिरी:- कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवरही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आज जिल्ह्यात 1 लाख 15 हजार 537 घरगुती आणि 8 सार्वजनिक बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. मिरवणुकांना बंदी असून गर्दी टाळण्यासाठी विसर्जनस्थळांवर दोनच व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. शहरी भागात कृत्रिम तलाव निर्माण केले असून समुद्रकिनार्‍यांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट दूर होऊ दे अशी गार्‍हाणे घालत ‘बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करत गणरायाला भक्त निरोप देणार आहेत.

यंदा 23 मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. जून महिन्यात लॉकडाऊन शिथील झाले तरी रत्नागिरीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. जनजीवन हळुहळू सुरळित होत असून अशा वातावरणात बाप्पांचे आगमन 22 ऑगस्ट रोजी झाले. त्यामुळे जिल्ह्यात गणरायाचा जल्लोष सुरू झाला. अनेक सार्वजनिक मंडळांनी यंदा उत्सव रद्द केला. काही मंडळांनी उत्सव दीड दिवसांचा केला. बाजारात खरेदीसाठी थोडी वर्दळ पाहायला मिळाली. परंतु सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर, मास्क आदीमुळे यंदा गणेशोत्सव ढोल-ताशांच्या गजराऐवजी नियमांमध्येच साजरा होत आहे.

गणरायाच्या प्रथा, परंपरेला खंड न पाडता घरच्या घरी आरत्या करण्यात आल्या. बंदीमुळे जाखडी, नाच असे सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकले नाहीत. आगमनाला मोठ्या मिरवणुकांऐवजी कमी भाविकांमध्येच बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ठिकठिकाणी सामुदायिक आरत्यांवरही निर्बंध असल्याने भाविकांनी गांभिर्य ओळखून वर्षानुवर्षे चालणारे कार्यक्रम रद्द केले. रत्नागिरी शहरात सर्वाधिक साडेपाच हजाराहून अधिक गणपतींचे विसर्जन होते. मांडवी, भाट्ये किनारी गर्दी होते. ती टाळण्यासाठी विसर्जनासाठी मूर्ती संकलन केंद्र आणि कृत्रिम तलाव तयार केले आहेत.

आततायीपणा टाळा
दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी टाकळे येथे दोघांचा बुडून मृत्यू झाला होत्या. कितीही पट्टीचा पोहतो किंवा पाणी कमी आहे म्हणून विसर्जनावेळी कोणीही आततायीपणा करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तळ्याच्या खोल पाण्यात किंवा खोल समुद्रात विसर्जनासाठी जाऊ नये, असेही पोलिसांनी सांगितले आहे.