रत्नागिरी:- राज्यातील गायरान जमिनीवर झालेली अतिक्रमणे हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे राज्यभरात अतिक्रमण करणाऱ्यांची धावाधाव सुरू आहे. काही ठिकाणी या निर्णयाविरुद्ध मोर्चे निघाले, आरोपांचे रान उठले; मात्र रत्नागिरी जिल्हा त्याला काहीसा अपवाद आहे. जिल्ह्यातील गायरान जमिनीची वस्तूस्थिती महसूल विभागाने तपासून पाहिली. तेव्हा एकूण ७८० हेक्टर गायरान जागा पूर्णपणे सुरक्षित आहे. या जमिनी कोणी लाटलेली नाहीत आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही झाले नसल्याचे समजते.
राज्याचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांनी गायरान जमिनीची विक्री केल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गायरान जमिनी किती आहेत, त्याची सध्या काय स्थिती आहे याची माहिती घेण्यात आली. जिल्ह्यात ७८० हेक्टर ७१ एकर ४० गुंठे इतकी गायरान जमीन आहे. ही सर्व जमीन सरकारदरबारी सुरक्षित असल्याचा दावा यंत्रणेने केला आहे. गायरान जमिनीमधील अतिक्रमणेदेखील हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचीही खातरजमा करण्यात आली आहे. जिल्ह्यात गायरान जमिनीवर अतिक्रमणे आहेत; परंतु पश्चित महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याएवढी नाहीत. त्या भागात गावच्या गाव गायरान जमिनीवर वसली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गायरान जमिनीवरील अतिक्रम अत्यल्प आहे.
२०११ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही जागा खासगी व्यक्तींना देता येत नाही किंवा त्यावर बांधकाम करता येणार नाही, असे आदेश आहेत. जिल्ह्यातील गायरान जमिनीची तालुकानिहाय माहिती अशी, मंडणगड तालुक्यात ९५ हेक्टर ६९ एकर, दापोलीत २१० हेक्टर ४५ एकर ४५ गुंठे, खेडमध्ये ४६४ हेक्टर ४३ एकर ८० गुंठे, गुहागरात ८१ एकर, संगमेश्वरात २ हेक्टर ४५ एकर, रत्नागिरीत ४ हेक्टर ९६ एकर ७९ गुंठे, राजापुरात १ हेक्टर ७० एकर ३० गुंठे असे गायरान आहे.









