जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

रत्नागिरी:- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ३० सप्टेंबर पर्यंत मेघगर्जनेसह, वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीविताची व मालमत्तेची काळजी घ्यावी, तसेच सतर्कता बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र अचानक बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवाऱ्यासह (ताशी ३० ते ४० किमी प्रती तास) पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. शनिवार २७ सप्टेंबर व २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. तसेच २९ व ३० सप्टेंबर: जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.