जिल्ह्यात २७ रुग्णालयांमध्ये ५ लाखांपर्यंत उपचार मोफत

सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा

रत्नागिरी:- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे. या योजनांसाठी असलेली उत्पन्नाची अट देखील पूर्णपणे हटवण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही नागरिकाला या योजनेंतर्गत तब्बल ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांबरोबरच सरकारी रुग्णालयांची संख्याही वाढवून आता २७ करण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण बदलामुळे आता आर्थिक दुर्बळ घटकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी काही विशिष्ट उत्पन्न गटातील कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, आता महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित केली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रितपणे राबवल्या जात आहेत.

या योजनेंतर्गत रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील आजारांसाठी रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते घरी सोडले जाईपर्यंत कॅशलेस आणि उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे. यामध्ये पिवळी, केशरी, अंत्योदय अन्न योजना व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबे (गट अ), शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे (गट ब), कोणतीही शिधापत्रिका नसलेली; परंतु महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबे (गट क), महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर अपघातग्रस्त झालेले महाराष्ट्र व भारताबाहेरील रुग्ण (गट ड) आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बिदर जिल्ह्यांतील ८६५ गावांतील शिधापत्रिकाधारक कुटुंबे (गट इ) यांचा समावेश आहे.

गट अ ते इ (ड वगळता) या सर्व गटांना दोन्ही योजनेंतर्गत प्रति व्यक्ती प्रतिवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत उपचाराचा लाभ मिळणार आहे. तर, अपघातग्रस्त रुग्णांसाठी (गट ड) प्रति व्यक्ती १ लाख रुपयांपर्यंतची मदत उपलब्ध असेल. रुग्णालयात दाखल ‘पासून ते घरी जाईपर्यंतचा सर्व खर्च, तसेच उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही गुंतागुंतीचा झाल्यापासून ते घरी जाईपर्यंतचा सर्व खर्च, तसेच उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही गुंतागुंतीचा खर्च या पॅकेजमध्ये समाविष्ट असून, या सर्व सेवा पूर्णपणे निःशुल्क असतील. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह रुग्णालयातून घरापर्यंत पोहोचवण्याचा खर्च देखील याच योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ही २७ रुग्णालये देणार जनआरोग्य योजनेचा लाभ

शासकीयमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय, आठ ग्रामीण रुग्णालये आणि ३ उपजिल्हा रुग्णालये तर खासगीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वालावलकर रुग्णलय डेरवण, श्री हॉस्पिटल-चिपळूण, लाइफकेअर हॉस्पिटल, एसएमएस हॉस्पिटल, श्री रामनाथ हॉस्पिटल, अपरांत हॉस्पिटल, रतनबाई घरडा हॉस्पिटल, परशुराम हॉस्पिटल, परकार हॉस्पिटल, श्री स्वामी समर्थ जनरल हॉस्पिटल, चिंतामणी हॉस्पिटल, रॉयल हॉस्पिटल आदींची जनआरोग्यसाठी निवड झालेली आहे.