रत्नागिरी:- शाळाबाह्य स्थलांतरित आणि शाळांमध्ये नियमित उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांची नोंदणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने 1 ते 15 जुलै दरम्यान सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न जि.प.प्रशासनाचा राहणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात शाळाबाहय़ मुलांसाठी सर्वेक्षण, म्हणजे शाळेत न जाणाऱ्या किंवा अनियमितपणे शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाद्वारे, अशा मुलांची माहिती गोळा केली जाते आणि त्यांना शाळेत परत आणण्यासाठी किंवा शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातात. एखाद्या गावात काही मुले आर्थिक अडचणीमुळे किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे शाळेत जाऊ शकत नाहीत. अशा मुलांसाठी सर्वेक्षण करून, त्यांना शाळेत येण्यासाठी मदत करता येते. त्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश किंवा इतर आवश्यक वस्तू पुरवून शिक्षणाच्या प्रवाहात आणता येते.
जि.प.शिक्षण विभागस्तरावर हे सर्वेक्षण जिल्ह्यातील गावागावांत, रेल्वे स्टेशन, विविध बांधकामे, सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, बस स्टेशन इत्यादी ठिकाणी करण्यात येणार आहे. शहर व जिल्ह्यात एकही विद्यार्थी या शाळाबाह्य मुले सर्वेक्षणातून वंचित राहणार नाही यी दक्षात शिक्षण विभागामार्फत घेण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने सप्टेंबरनंतर खाण कामगार आणि डिसेंबरनंतर आंबा हंगाम सुरू होतो. त्यासाठी परराज्यातून, परप्रांतांतून मजूर, कामगार येत असतात. तसेच महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यातील कामगार येतात. अशा कामगारांच्या मुलांचा सर्वेक्षणातून शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वेक्षणाची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तर शहरातील नगर पालिकांच्या शिक्षण विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
यासंदर्भात जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी शिक्षण विभागातील अधिकारी वर्गाची बैठक पार पडली या बैठकीत रानडे यांनी महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. शाळाबाह्य मुले शिक्षण आणि विकासाच्या संधींपासून वंचित राहतात. या मुला-मुलींना शिक्षण देणे, हे त्यांचे मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे, शाळाबाह्य मुलांसाठी सर्वेक्षण करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे, या मुलांना शाळेत परत आणता येते आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करता येते. त्यासाठी जि.प.स्तरावर 15 जुलैपर्यंत जरी सर्वेक्षणाची मुदत असली तरी हे सर्वेक्षण वर्षभर शैक्षणिक कालावधीत राबवण्यात यावे अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.









