जिल्ह्यात सात वर्षांमध्ये वन्यप्राण्यांचा ४६ जणांवर प्राणघातक हल्ला

विहिरीत पडलेल्या बिबट्यांची नोंद लक्षणीय

रत्नागिरी:- जिल्ह्यातील मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढत चालला असल्याने अनेक गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. बिबट्या दिवसाही माणसावर हल्ला करत आहे. काही ठिकाणी तर बिबट्‌या आणि मानव यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी ४६ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला असून, ४१ जण गंभीर, तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

मृतांच्या नातेवाइकांसह जखमींना आतापर्यंत १ कोटी ०९ लाख ४० हजार १६३ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात फासकीत अडकलेल्या तसेच विहिरीत पडलेल्या बिबट्यांची नोंद लक्षणीय आहे. त्याचबरोबर अज्ञात वाहनांच्या धडकेत, विहिरीत कोसळल्याने तसेच उपासमारीमुळे बिबट्यांचे मृत्यू वाढत चालले आहेत. मध्यंतरी फासकीत अडकून मृत्युमुखी पडणाऱ्या बिबट्यांची संख्या वाढल्यानंतर पोलिस वनविभागाने फासकीविरोधात कडक धोरण अवलंबले. त्यामुळे त्यामध्ये घट दिसून येत असली तरी आता हळूहळू फासको डोके वर काढत असल्याचे अधूनमधून घडत असलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे.

बिबट्या पकडण्याच्या साहित्यासाठी निधी
मानवी वस्तीमध्ये आढळणाऱ्या बिबट्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाला जिल्हा नियोजन मंडळातून अधिकचा निधी देण्यात आला आहे. त्यातून पिंजरे, कैमेरा ट्रॅप, वाहने आणि ड्रोन पुरवण्यात आले आहे.

३४ बिबट्यांचा मृत्यू, ३२ बिबट्यांची सुटका

रत्नागिरीत २०२२ ते २०२५ या कालावधीत ३४ बिबट्यांच्या मृत्यूंची नोंद आहे. तर विविध घटनांमध्ये अडकलेल्या ३२ बिबट्यांची सुटका करण्याच्या मोहिमाही यशस्वी झाल्या आहेत. २०२२ मध्ये ३, २०२३ मध्ये १३, २०२४ मध्ये १४ तसेच २०२५ मध्ये १७ मृत बिबट्यांची नोंद झाली आहे. याचा अर्थ मृत बिबट्यांची संख्या वाढते आहे. हे मृत्यू नैसर्गिक नाहीत, ही चिंतेची गोष्ट आहे.

दाभोळे गावात आढळून आले बिबट्याचे पांढरे पिल्लू

भक्ष्याचा पाठलाग करत असताना बरेच बिबटे उघड्या विहिरीमध्ये पडतात. बिबट्यांचा वावर असलेल्या गावांची संख्या निश्चितपणे सांगता येत नाही. जंगल क्षेत्र असलेल्या गावांमध्ये बिबट्या अधिक प्रमाणात असतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावात प्रथमच महाराष्ट्रात बिबट्याचे दुर्मीळ पांढरे पिल्लू (अल्बिनो किवा ल्युसिस्टिक) आढळून आले. ही वन्यजीव अभ्यासकांसाठी एक महत्त्वाची घटना होती, समुद्र किनाऱ्याजवळच्या गावांमध्येही आता बिबट्याचे वास्तव्य दिसू लागले आहे. त्याच्यासाठी जंगलात रानडुक्कर, ससा व इतर प्राणी खाद्य म्हणून उपलब्ध आहे; परंतु बिबट्या आता दिवसाही मनुष्यवस्तीतील श्वानांना लक्ष्य करू लागला आहे. जंगलांची बेसुमार तोड आणि चुकीच्या पद्धतीने झालेल्या विकासकामांमुळे वन्यप्राण्यांनी आपले हक्काचे अधिवास गमावले आहे.