जिल्ह्यात सात ठिकाणी महिलाराज

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; पुरुषांच्या मनसुब्यांवर पाणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ५ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. त्यामध्ये ९ पैकी ७ ठिकाणी सर्वसाधारण महिला आरक्षण आहे तर चिपळूण नगरपालिका आणि दापोली नगरपंचायतीत सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सात ठिकाणी महिलाराज येणार आहे. आरक्षणामुळ सर्वच पक्षातील अनेक पुरुष इच्छुक उमेदवारांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत तर काहीजण पत्नीसाठी मोर्चेबांधणीला लगेचच सुरवात करणार आहेत.

राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण आज सकाळी जाहीर झाले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ४ पालिका आणि ५ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाले. रत्नागिरी पालिकेचे नगराध्यक्षपद खुला प्रवर्ग महिलासाठी आरक्षित असल्यामुळे अनेक प्रतिष्ठित इच्छुक लोकप्रतिनिधींचा हिरमोड झाला. गेल्या दोन वर्षांपासून सर्वसाधारण पदासाठी आरक्षण राहिल्यास उमेदवारी मिळावी यासाठी तयारी ठेवली होती. आता महिला आरक्षणामुळे सर्वंच पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना शहरांचा कारभार हाकण्याची संधी मिळणार आहे. चिपळूण आणि दापोली पालिका याला अपवाद ठरणार आहे. चिपळूण नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे. मागील वेळी या ठिकाणी महिला नगराध्यक्ष होत्या. या निवडणुकीत दिग्गज पुरुष इच्छुकांना संधी मिळणार आहे. ही एकप्रकारे सर्वच पक्षांसाठी डोकेदुखीच ठरणार आहे. दापोली नगरपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. त्यामुळे तेथील निवडणुकीसाठी अजून कालावधी आहे. खेड, राजापूरमध्ये सर्वसाधारण महिलासाठी राखीव आरक्षण आहे. त्यामुळे तिथेही अनेक दिग्गजांचा हिरमोड झाला आहे. जिल्ह्यातील ५ पंचायत समितीत हीच परिस्थिती आहे. मंडणगड, गुहागर, देवरूख, लांजा या चार नगरपंचायतीमध्येही खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव पडला आहे. जिल्ह्यात ७ ठिकाणी महिला नगराध्यक्ष विराजमान होणार असून, शहरांचा कारभार हाकण्याची संधी महिलांना मिळाली आहे.