जिल्ह्यात साडेअकरा हजार हेक्टरवर होणार नाचणीची लागवड

कृषी विभाग; आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षातील उपक्रम

रत्नागिरी:- आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त यंदा रत्नागिरी जिल्ह्यात नाचणीची लागवड वाढविण्यासाठी कृषी विभागाला सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये पीक व्यवस्थापन व प्रक्रिया उत्पादने प्रकल्प राबविला जाणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी साडेनऊ हजार हेक्टरवर नाचणीची लागवड केली जाते. यंदा त्यात १५ टक्के वाढ केली जाणार असून साडेअकरा हजार हेक्टरचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी तालुकानिहाय कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

नाचणी हे आहारदृष्ट्या इतर धान्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. कॅल्शिअम, लोह, तंतुमय पदार्थ आणि मुबलक प्रमाणात खनिज आहेत. मात्र स्निग्ध पदार्थ (फॅट) अत्यंत कमी असल्याने नाचणी आरोग्याला हितकारक आहे. पचनास हलकी आणि ग्लुटेन नसल्यामुळे उपयुक्त ठरते. आरोग्याला पोषक अशा नाचणीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने रत्नागिरी जिल्ह्यात प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्दीष्ट निश्‍चित करुन दिले आहे. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षात नाचणीची लागवड वाढविण्यात येणार आहे. सर्वाधिक लागवड गुहागर तालुक्यात होते. त्यापाठोपाठ राजापूर, दापोली, रत्नागिरी तालुक्याचा क्रमांक लागतो. पुर्वी खरीप हंगामात कातळावर मोठ्याप्रमाणात नाचणीची लागवड केली जात होती; परंतु माकडांसह जंगली प्राण्यांचा त्रास सुरु झाल्यामुळे नाचणीकडे अनेक शेतकर्‍यांनी पाठ फिरवली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. नाचणी पिकात असलेले पौष्टिक घटक विचारात घेऊन शासनाकडून याला महत्व दिले गेले आहे.