जिल्ह्यात समूह शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग

रत्नागिरी:- कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार असल्याचे मंत्री सांगत आहेत. मात्र दुसर्‍या बाजूला समहू शाळा सुरु करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील 1345 शाळांना कुलूप लागण्याची शक्यता आहे. गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत समूह शाळांबाबत आढावा घ्या, असे आदेश आयुक्त कार्यालयामार्फत जि. प. ला देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सध्यातरी मंडणगड व दापोली या तालुक्यात प्रत्येकी एक समूह शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाची सुविधा जिल्हा परिषद शाळांमुळे उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये खासगी व इंग्रजी शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांचा पट घसरत आहे. ही चिंताजनक बाब आहे. मुळांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून समूह शाळांची संकल्पना राबविण्याचा विचार पुढे आला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश दिले गेले; मात्र याला गावस्तरावरुन विरोध होत आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांचा मोठा आधार आहे. आधीच मुलांना पायपीट करत शाळेत जावे लागत आहे. चार ते पाच शाळा एकत्र केल्यास मुलांची पायपीट वाढणार आहे. यामध्ये मुलांचा शिक्षणाकडील कल कमी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विरोध होत आहे. तरीही शासनाने समुह शाळांची संकल्पना राबविण्याचा निर्णय दामटला
आहे.

दोन दिवसांपूर्वी आयुक्तस्तरावर समुह शाळांच्या संकल्पनेचा आढावा जिल्हानिहाय घेण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून अजुनही एकही प्रस्ताव आलेला नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. मात्र दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यात प्रत्येकी एक समूह शाळा सुरु करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर तिथे समुह शाळा निर्माण होऊ शकते. याच पध्दतीने अन्य तालुक्यातही समुह शाळा संकल्पना राबविण्यासाठीची यादी तयार करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत सर्व्हे केला जाणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये तशी यादी तयार करुन शासनाला सादर करावयाची आहे. तशा सूचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिका र्‍यांना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात 1 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या 1345 आहे. त्यात 1 ते 10 पट असलेल्या 713 शाळा आहेत. समूह शाळांमुळे पट कमी असलेल्या काही शाळांवर बंदची टांगती तलवार निर्माण झाली आहे.