पारंपारिकता जपण्यास ग्रामस्थ सक्रिय; संकासूर-गोमुच्या नृत्याची रंगत
रत्नागिरी:- कोकणातील प्रमुख उत्सव शिमगोत्सवाला जिल्ह्यात जल्लोषात सुरुवात झाली आहे. शिमगोत्सवात ग्रामदेवतांच्या या सणाची प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात आदराची भावना असते. शिमगोत्सवाचा आनंद द्विगुणीत कऱण्यासाठी राज्यातून, परजिल्ह्यातून ग्रामस्थ कुटुंबासह गावात येतात. जिल्ह्यात १ हजार ३९९पालख्या धुलीवंदनापर्यंत भक्तांच्या भेटीला येणार आहेत. ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतांचे स्वागत होळी व शिमगोत्सव साजरा होणार आहे.
शिमगोत्सवाची मोठी धामधूम खऱ्या अर्थाने तेरसे शिमग्याच्या माध्यमातून सुरु होणार आहेत. धुलिवंदनाच्या दिवशी पौर्णिमेचे (भद्रे मुहुर्तावर) शिमगे येत्या १४ मार्चला साजरे करण्यात येणार आहेत. गावागावात शिमगोत्सवाचा आनंदोत्सव शिगेला पोहचला असून पाली भेट सोहळे, संकासूर-गोमूच्या नृत्याबरोबर फिरत्या खेळ्यांनी उत्सवात रंग चढला आहे. गावकरी चाकरमानी असे सारेच उत्सवाच्या नियोजनात व्यस्त झाले आहेत.
गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या डौलाने रुपे लावून सजल्या आहेत. जिल्ह्यात १३९९ पालख्या धुलीवंदनापर्यत व त्यापुढेही अगदी गुढीपाडव्यापर्यत तसेच काही मोठ्या गावांमध्ये त्यानंतरच्या काळातही भक्तांच्या भेटीला घरोघरी येणार आहेत. जिल्ह्यात १३१५ ठिकाणी सार्वजनिक तर २८५४ ठिकाणी खासगी होळ्या उभारण्यात येणार आहेत. तेरसे शिमगोत्सवात सुरवात झाल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरात स्थाक असलेली मंडळी गावाकडे आली आहे. ऐरवी नोकरीनिमित्त बाहेर गावी असलेल्या चाकरमानी शिमगोत्सात दाखल होतात. मान पान ग्रामदेवतांची पूजा, गावकरी मंडळी यांच्यासमवेत भेटीगाटी, चर्चा भक्तीमय वातावरणात होतात. शिमगोत्सवात ढोल ताशांच्या गजरात आणि मोठ्या उत्साहात शिमगोत्सवाचा आनंद व्यक्त करण्यात येतो. गावा-गावातील ग्रामदेवतावरिल ग्रामस्थांची निस्सिम भक्ती शिमगोत्सवातून दिसून येते.
अनेक ठिकाणी ग्रामदेवातांच्या पालख्या शिमगोत्सावाच्या दिवशी होळ्या घेण्यासाठी मंदिराबाहेर पडतात. ढोल ताशांच्या गजरात आणि फाकांच्या आवाजात पालख्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येते. काही ठिकाणी तर पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगतो आणि याला हजारोंनी भक्तगण हजेरी लावतात. शिमगोत्सवाच्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी नाचवली जाते. अतिशय सुंदर असा हा सण साजरा केला जातो. जिल्हाभरात घरी येणाऱ्या देवदेवातांच्या पालखीच्या स्वागतासाठी ग्रामस्थ व चाकरमान्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.