पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज
रत्नागिरी:- जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. शनिवारी रात्री आणि रविवारी परतीच्या पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली. 29 ऑक्टोबर पर्यंत परतीच्या पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पाऊस किनारपट्टी भागात बरसण्याची शक्यता अधिक असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
परतीच्या पावसाने एक दिवस काही प्रमाणात उसंत घेतली होती. मात्र, शनिवारी दुपारनंतर पाऊस पुन्हा हजर झाला. सायंकाळी पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 29 ऑक्टोबर या कालावधीत ऑरेंज अर्लट देण्यात आलेला आहे. 29 ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.
वादळी पावसाने मासेमारी तीन दिवसांपासून ठप्प
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. मासेमारी हंगाम संपुष्टात येण्यासाठी अवघे आठ दिवस हाती असताना आलेल्या परतीच्या वादळी पावसाने मच्छीमारांचे मोठे नुकसान केले आहे. समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना मच्छीमारांना देण्यात आल्या आहेत. यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे.









