जिल्ह्यात वादळी पावसाने नऊ लाखांचे नुकसान

रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी घरांवर झाड पडून पावसाचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे सुमारे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात पांगरी येथील अंगणवाडीचे पत्रे उडल्यामुळे नुकसान झाले. विद्यार्थ्यांना अंगणवाडीत बसता येत नव्हते. कसबा येथे अब्दुल कादीर इस्माईल दळवी यांच्या घराजवळ १० फूट संरक्षक भिंत कोसळून सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. त्यातील शिल्लक राहिलेली संरक्षक भिंत धोकादायक असून, यामुळे जवळच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.

रामपेठ येथे महामार्गावर साचलेले पाणी सचिन शेट्ये यांच्या घरात घुसल्यामुळे एक लाख ३८ हजारांचे, तर पुर्येतर्फे देवळे जांभवाडी येथे सोना गोरुळे व मंगेश गोरुळे यांची संरक्षक भिंत कोसळून एक हजाराचे नुकसान झाले.

गुहागर तालुक्यात तळवली येथे घरावर वीज पडल्यामुळे गणेश विठ्ठल भोळे यांचे सुमारे दोन लाखांहून अधिक, तर त्यांचे भाऊ अनंत विठ्ठल भोळे यांचे तीन लाखांहून अधिकचे इलेक्ट्रिक सामान जळून नुकसान झाले. पार्वती बेंद्रे यांच्या घराजवळील सार्वजनिक विहिरीचा कठडा कोसळून साठ हजारांचे, चिपळूण तालुक्यातील देवपाट टेकडेवाडी येथे पांडुरंग दुर्गुळे व दीपक दुर्गुळे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून दीड लाखांचे नुकसान झाले. कामथे येथे बाबू जाधव यांच्या शौचालयावरही झाड पडले. दापोली तालुक्यातील मुरुड येथे अर्चना गुरव डी यांच्या घराची शेड पडली, बुरुंडी -. येथील सबाब बुरुंडकर यांच्या घरावर झाड कोसळून ३६ हजार ६५० रुपयांचे, तर लईका बुरुडकर यांच्या घरावर झाड पडून पाच हजारांचे नुकसान, झाले. करंजगाव येथे हादेव तांबोळी यांचा गोठा कोसळून ९५ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाले. दापोली कॅम्प येथे अब्दुल मुकादम यांच्या घराच्या ने छताचे एक लाख ८० हजारांचे; तर ओणनवसे येथे भारत खोत यांच्या घरावर माड कोसळून १४ हजारांचे नुकसान झाले.

मागील चोवीस तासांत पावसामुळे अनेक ठिकाणी वीजखांब पडल्याच्याही घटना घडल्या असून, अनेक भागात वीजप्रवाह खंडित झाला होता. महावितरण कर्मचाऱ्यांनी हा वीजप्रवाह सुरळीत करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल सकाळी ८.३० पर्यंतच्या चोवीस तासांत मंडणगड २७.७५ मि.मी., खेड ९४.२८ मि.मी., दापोली १०५.७१ मि.मी., चिपळूण ९९.२२ मि.मी., गुहागर १९०.४० मि.मी., च संगमेश्वर ११६.४५ मि.मी., रत्नागिरी १२४.११ मि.मी., लांजा १२८ मि.मी., राजापूर ५० मि.मी. अशी जिल्ह्यात ९३५.९२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.