जिल्ह्यात वर्षभरात कर्करोगाचे सापडले ४१ रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कर्करुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्हयामध्ये जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत एकूण ४१ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी तोंडाच्या कर्करुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे चौदा, सर्व्हिकल कॅन्सर एक रुग्ण तर कॅन्सरच्या इतर प्रकारातील १६ रुग्ण सापडले आहेत.

असंसर्गजन्य आजारांची झपाटयाने वाढ होत असून जवळपास ६३ टक्के मृत्यु हे असंसर्गजन्य रोगामुळे होत आहेत. त्यापैकी कर्करोगामुळे होणा-या मृत्युंचे प्रमाण ९ टक्क्यांवर आहे. Globocan २०२० च्या सर्वेक्षणानुसार कर्करोगाचे १३ लक्ष २४ हजार रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या काळातील बदलती जीवनशैली व सवयी यांमुळे कर्करोग रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे.

वाढत्या कर्करोगाचे प्रमाण कमी करणे व जास्तीत जास्त लोकांची तपासणी करुन त्यांना वेळीच उपचार आणि संदर्भ सेवा देण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे दि. ४ फेब्रुवारी पासुन जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधुन संपूर्ण राज्यामध्ये कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिम सुरु करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हयामध्ये सर्व ग्रामिण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये सदर मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सदर मोहिमे दरम्यान जिल्हयातील ३० वर्षावरील लोकांचे मौखिक (Oral), स्तन (Breast) व गर्भाशय मुख (Cervix) कर्करोग या करिता सर्व आरोग्य संस्थामध्ये तपासणी शिबीर आयोजित करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात वर्षभरात कर्करोगाचे ४१ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून सर्व रुग्णांवर जिल्हा शासकिय रुग्णालय येथे मोफत किमोथेरपी उपचार करण्यात येत आहे.

वाढते कर्करोग रुग्णांचे प्रमाण बघता, जास्तीत जास्त लोकांना कर्करोगावर त्वरीत तपासणी व उपचार करण्याकरिता जिल्हा शासकिय रुग्णालय येथील ओपीडी क्र. ०२ येथे आठवडयातील दर बुधवारी लाईफ केअर हॉस्पिटल मधील विशेत्तज्ञ डॉ. शुभम बगाडे यांमार्फत कर्करोग रुग्ण तपासणी व उपचार केले. जातात. तसेच महिन्यातून एक शुक्रवार डॉ. विक्रम घाणेकर, ऑकोसर्जन यांमार्फत रुग्ण तपासणी, केमोथेरपी उपचार मोफत करण्यात येत आहेत.

कर्करोग रुग्ण तपासणी त्वरीत, अचूक व अधिक सोईस्कररित्या करण्याकरिता डिजिटल उपकरणांचा वापर रत्नागिरी जिल्हयामध्ये करण्यात येत आहे. ग्रामिण रुग्णालय पाली, राजापूर, देवरुख आणि उपजिल्हा रुग्णालय कामथे, दापोली येथे Quantified Health कंपनी मार्फत स्तन तपासणी करिता डिजिटल कोल्पोस्कोप उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तरी अश्या सर्व सुविधांचा लाभ जनतेने घ्यावा व एकजुटीने एकत्र लढून कर्करोगावर मात करावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. कर्करोगविषयक आरोग्य सल्ला मिळविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०४ डायल करा असे आवाहन करण्यात आले आहे.