रत्नागिरी:- जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. लांजा आणि रत्नागिरी या दोन तालुक्यात मिळून 24 जनावरे लम्पीबाधित आढळली आहेत. त्यातील दोन जनावरे मागील आठवडाभरात दगावल्यामुळे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. लसीकरणावर भर दिला जात असून, लागण झालेल्या जनावरांवर त्वरित उपचार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
तीन महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यानंतर तातडीने पशू विभागाकडून जनावरांना लस देण्यात आली होती. मागील वेळी 78 जनावरांना लागण झाली होती. गेल्या काही दिवसात पुन्हा या आजाराने डोके वर काढले आहे. दोनच तालुक्यामंध्ये या आजाराची लागण झालेली जनावरे आढळली आहेत. रत्नागिरीत 16 जनावरे आढळली असून, एक मृत पावले तर लांजा तालुक्यात 8 जनावरे सापडली असून 1 मृत पावले आहे. जिल्हाभरात पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांना लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यात मागील जनगणनेनुसार, पशुपालकांकडे एकूण 2 लाख 35 हजार पशुधन आहे. त्यांना आवश्यक तेवढीच लस जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. पशूंसाठी लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 14 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये बैल 56 हजार 599, गाय 48 हजार 637 आणि वासरं 9 हजार 380 आहेत. उर्वरित लसीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.