रत्नागिरी:- आझादी का अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात दि. 9 ते 14 ऑगस्टअखेर जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
बुधवार, दि. 9 ते 14 ऑगस्टअखेर गावातील अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायती एका ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. वसुधा वंदन या उपक्रमामध्ये गावातील विविध ठिकाणी 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून त्या ठिकाणी अमृतवाटिका करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या निवृत्त विरांचा, स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात यावा. ग्रामपंचायत स्तरावर सर्व अधिकारी, कर्मचारी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी पंच प्रण शपथ घेण्यात यावी. गावक्षेत्रातील अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत आदी ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायनासह तिरंगा फडकवण्यात यावा. दि. 16 ते 20 ऑगस्टअखेर तालुकास्तरावर प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करावी. हा मातीचा कलश दि. 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीत प्रधानमंत्री कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेऊन जाण्यास एका युवकांची निवड करावी. हा कार्यक्रम लोकसहभागातून केंद्र शासनाकडून राज्यस्तर, विभागस्तर, तालुकास्तर ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबवण्याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिली.