रत्नागिरी:- नित्यनियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी आता कुटुंबस्तरावर ‘स्वच्छ माझे अंगण’ हे अभियान जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. 1 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत हे अभियान असून, उत्कृष्ट स्वच्छता असणार्या कुटुंबांचा जि.प.कडून गौरव करण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, (कुटुंबस्तर), सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तर) राबवित असलेल्या राज्यातील सर्व कुटुंबस्तरावर या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन नित्य नियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगिकृत करण्यासाठी जे कुटुंब वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनकरिता शोषखड्डा/परसबाग/पाझरखड्डा, घनकचरा व्यवस्थापनाकरिता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा आणि कुटुंबस्तरावर कचराकुंड्या याबाबतची उपलब्धता करून घेतली असून त्यांचा नियमितपणे वापर करतात अशा कुटुंबाना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे अनुकरण करण्याकरिता इतर ग्रामस्थांना, कुटुंबधारकांना त्यांच्या प्रमाणेच वैयक्तिक स्वरुपांच्या स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी उदयुक्त करणे ही या अभियानाची संकल्पना आहे.
सदर अभियानाची अंमलबजावणी करताना वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करणे, शौचालयाची दैनंदिन स्वच्छता, शाश्वत स्वरुपात सर्व कुटुंब सदस्यांकडून वापर आणि ही सुविधा निरंतर टिकावी म्हणून आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करण्यात कुटुंबांचा पुढाकार, कुटुंबस्तरावर दैनंदिन घनकचर्याचे वर्गीकरण करणे, कुटुंबस्तरावर सुका कचरा, ओला कचरा कुंड्यांमध्ये वर्गीकरण करणे, वर्गीकरण केलेल्या घरगुती कचर्याचे कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा निर्मिती करुन कचर्याचे, घर किंवा घराच्या परिसरातच व्यवस्थापन करणे, सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तरावर), परसबाग, पाझरखड्डा, शोषखड्डा याद्वारे घरगुती स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन घर किंवा घराच्या परिसरातच करणे.
सदरील विषयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या निकषानुसार, कुटुंबस्तरावरील प्रत्येक घटकाचे शास्त्रशुद्ध पध्दतीने व्यवस्थापन करण्यासाठी गावातील सर्व कुटुंबामध्ये ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान राबविण्यात यावे, या बाबींवर भर देण्यात येणार आहे.
अभियानाची माहिती/सूचना गावात दवंडी देणे, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सोसायटी कार्यालय, तलाठी कार्यालय या ठिकाणच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निकषाच्या अनुषंगाने निवड केलेल्या कुटुंबांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर लावावी. त्याचबरोबर संबंधित कुटुंब अभियानात पात्र झाले असल्याबाबत लेखी स्वरुपात कळवून त्यांना कार्यक्रमाकरीता निमंत्रित करण्यात यावे. उत्कृष्ट व्यवस्थापन करणार्या कुटुंबांना 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत कुटुंबस्तरावरील बाबींचे शास्त्रशुद्ध पध्दतीने, व्यवस्थापन करुन नियमित वापर करतात अशा कुटुंबांना सन्मानित करण्यासाठी श्रीफळ, पुष्प व प्रशस्तिपत्र देऊन ग्रामपंचायतीने सन्मान करावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी केले आहे.