रत्नागिरी:- जिल्ह्यात सोमवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या प्रमुख शहरांमध्ये व ग्रामीण भागातही ईद निमित्त मोहल्ल्यांमध्ये सजावट करण्यात आली होती. सोमवारी सकाळी ईदचा नमाज पडून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईद निमित्त मागील दोन दिवस बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. मिठाई व कपडे खरेदीकडे मोठा कल होता. ईद निमित्त काही मुस्लीम बांधवांनी नवीन वाहनेही खरेदी करुन कुटुंबियांना भेट दिली. जिल्ह्यात मुस्लीम समाजातील अनेक नागरिक नोकरीनिमित्ताने सौदी व परदेशामध्ये आहेत. अनेक नागरिक ईदनिमित्ताने आपल्या गावी आले असल्याने कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोमवारी ईद निमित्त अनेकांनी आपले नातेवाईक व मित्रमंडळींच्या घरी जाऊन ईद निमित्त मिठाई, शिरकुरमा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीमध्ये मुस्लीम बांधवांनी थिबापॅलेस, मांडवी व भाट्ये समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटला. शहरातील अनेक बागाही भरुन लहान मुलांनी फुलून गेल्या होत्या.