जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी 

रत्नागिरी:- पापाला नष्ट करून पुण्य कमविणे हा रमजानचा खरा उद्देश आहे. मुस्लिम धर्मियांमध्ये मागील एक महिन्यांपासून रजमान मास सुरू होता. अल्लाच्या आज्ञेचे पालन करणे आणि शांततेचे रक्षण करत महिनाभर दर दिवशी ९ वेळा नमाज अदा करून तीस दिवस रोजा अर्थात उपवास धरले जातात. हा रमजान महिना मंगळवारी ईदने साजरा करण्यात आला. पवित्र कुराण याच काळामध्ये प्रगटल्यामुळे या रमजान महिन्याला मुस्लिम धर्मियांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मंगळवारी रत्नागिरी शहरातील १३ प्रमुख मशिदींसह जिल्हाभरात नमाज पठण करून अबाल वृद्धांनी ईद साजरी केली. 

ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. रमजान महिन्यांतील रोजे म्हणजेच उपवास संपल्यानंतर ईद येते. रमजान महिन्याची सांगता ईदने होते. रमजान महिना मुस्लिम धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र सण म्हणून साजरा केला जातो. रमजान महिना संपल्यानंतर चंद्रदर्शन होताच ईद सण साजरा होतो. मंगळवारी ईद हा सण मुस्लिम धर्मियांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. यात हिंदू बांधवही सहभागी होतात. 

मंगळवारी येणाऱ्या ईदच्या मुहूर्तावर तरूण-तरूणी, महिला पुरूष सर्वजण नवीन कपड्याची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. मशिदीमध्ये अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक अशा शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीसह चिपळूण, राजापूर, लांजा, संगमेश्वर आदी तालुक्यांमध्ये ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रत्नागिरी शहरातील, झारणी रोड, उद्यमनगर, मिरकरवाडा, कर्ला, पटवर्धन हायस्कूल, शिरगाव आदी १३ ठिकाणी ईद सण उत्साहात साजरा करण्यात आला. ईद निमित्त मुस्लीम बांधवांनी आपापल्या मित्र परिवारासाठी मोठ्या मेजवानीचेही आयोजन केले होते. 

रत्नागिरी शहरात मुस्लिम बांधवांना ईदीच्या शुभेच्छा देणाऱ्या राजकीय फलकांनी नाक्यानाक्यावर गर्दी केली होती. शहरात ठिकठिकाणी ईदीच्या शुभेच्छा देणारे फलक झळकवण्यात आले होते. ईदनिमित्त रत्नागिरीतील सिनेमागृहदेखील हाऊसफुल्ल झाली होती. रत्नागिरीच्या सिनेमागृहातील सर्व शो हाऊसफुल्ल झाले होते.